सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना गप्प केले जाते! प्रा. आनंद तेलतुंबडे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

शहरी नक्षलवाद हा प्रकारच अस्तित्वात नाही. ही केवळ संकल्पना निर्माण केली जात आहे. पण लोकशाहीचा हक्क जपत आणि लोकांचा कैवार घेऊन जे लोक लढण्याची हिंमत करतात, सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवतात, त्यांना गप्प केले जाते, अशा शब्दांत प्रख्यात विचारवंत व लेखक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी सरकारवर कडक शब्दांत आज टीका केली. सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात प्रा. तेलतुंबडे यांचा वार्तालाप आयोजित केला होता. त्या वेळी बोलताना त्यांनी आपल्या अटकेमागे सूडबुद्धीने षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही केला. कोरेगाव-भीमा प्रकरणी घेण्यात आलेल्या एल्गार परिषदांमध्ये हात असल्याच्या आरोपाखाली प्रा. तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या अटकेस आव्हान देणाऱ्या तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर असून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश नुकतेच विशेष न्यायालयाने दिले. त्यामुळे या सर्व संदर्भात ते नेमकी कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माओवाद्यांसारखी मंडळी नेहमी टोपण नावाचा वापर करतात, हे वारंवार समोर आले आहे. ते काही मोठे लेख लिहीत बसत नाहीत, हे उघड आहे. त्याविषयी आंध्र प्रदेशमधील पोलीस अधिकाऱयांसह अन्य काहींनीही स्पष्ट मत मांडल्याचे तेलतुंबडे म्हणाले.

अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात
भीमा-कोरेगाव हिंसाचार व शहरी नक्षलवादप्रकरणी प्राचार्य आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आपल्याला अटक करू नये म्हणून तेलतुंबडे यांनी हायकोर्टात अर्ज केला असून या अर्जावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.