
अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्या अनंत भालेराव स्मृती पुरस्काराचे वितरण रविवार (दि.13) रोजी येथे होणार्या विशेष कार्यक्रमात होणार आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय आणि अर्थविषयक घडामोडींचे विश्लेषक गिरीश कुबेर यांना प्रदान केला जाणार आहे. मराठवाडा वृत्तपत्राचे संपादकपद दीर्घकाळ भूषविलेल्या अनंतरावांनी पत्रकारितेत येण्यापूर्वी हैदराबाद मुक्तिसंग्रामात कृतिशील योगदान दिले होते.
हैदराबादच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सध्या सुरू असताना, प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पुरस्कार अमृतमहोत्सवी वर्षातच दाखल झालेल्या लोकसत्ता दैनिकाच्या संपादकांना दिला जात आहे. हा कार्यक्रम मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाल्यानंतर कुबेर यांचे व्याख्यान होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता पानट यांनी कळविले आहे.
गिरीश कुबेर गेली साडेतीन दशके पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्य पातळीवरील काही वृत्तपत्रांत महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळल्यानंतर ते मागील एक तपापासून लोकसत्ताचे संपादकपद भूषवित आहेत. वृत्तपत्रीय लिखाणाशिवाय त्यांनी इतर वेगवेगळ्या विषयांवर विपुल लेखन केले आहे. मराठवाड्यातील स.मा.गर्गे पुरस्कार त्यांना काही वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यानंतर अनंतरावांच्या नावाने असलेल्या आणखी एका मोठ्या पुरस्काराने त्यांचा गौरव होत आहे. या कार्यक्रमास निमंत्रित तसेच वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.



























































