हेगडे यांचा पत्ता कट घटना बदलण्याचे वादग्रस्त वक्तव्य भोवले

घटना बदलणार, त्यासाठीच आपल्याला 400हून अधिक जागा हव्या आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी भाजपने विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी दिली आहे. कागेरी हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले असून त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.

भाजपने खडय़ासारखे बाजूला सारलेले हेगडे हे गेल्या 28 वर्षांत उत्तर कन्नड मतदारसंघातून सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याचा पक्षश्रेष्ठीचा सल्ला न ऐकल्याचा फटका त्यांना मिळाला आहे.

त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. तेव्हा लगेच भाजपने हेगडे यांचे वक्तव्य हे त्यांची वैयक्तिक मते आहेत, असे म्हणत हात झटकले होते. तेव्हाच आता हेगडे यांचे तिकीट कापले जाणार याचे संकेत मिळाले होते.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी आणि परवेश साहिब सिंग वर्मा यांना विद्यमान खासदार असूनही पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. प्रक्षोभक वक्तव्यांमुळे ऐन निवडणुकीत पक्षाला अडचणीत आणणाऱ्यांची भाजपने धास्ती घेतली असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.