संस्कृतप्रवाह : उपनिषदातील शिक्षणपद्धती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. प्राची मोघे

वैदिक साहित्यातील उपनिषद हे एक महत्त्वाचे अंग आहे. उपनिषदातील शिक्षण हे परा विद्या (सर्वोच्च अध्यात्मिक ज्ञान) आणि अपरा विद्या देणारे आहे.  उपनिषद हे तत्कालीन शिक्षण पद्धती समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे. हिंदुस्थानी शिक्षण पद्धतीचे मूळ आपल्याला उपनिषदातील गुरू-शिष्य संवादातून, कथांमधून सापडते.

वैदिक साहित्यातील उपनिषद हे एक महत्त्वाचे अंग आहे. उप म्हणजे जवळ आणि नि + सद म्हणजे बसणे; गुरूजवळ बसून जे ज्ञान मिळवले जाते ते उपनिषदात मांडले आहे. उपनिषदातील शिक्षण हे परा विद्या (सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान) आणि अपरा विद्या देणारे आहे. खरं तर उपनिषद हे ब्रह्मज्ञान मिळवण्याचे साधन आहे असे म्हटले जाते. उपनिषद हे तत्कालीन शिक्षण पद्धती समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे. हिंदुस्थानी शिक्षण पद्धतीचे मूळ आपल्याला उपनिषदातील गुरू-शिष्य संवादातून, कथांमधून सापडते.

1. ब्रह्मज्ञान प्राप्ती – अथ तो ब्रह्म-जिज्ञासा असे म्हणत उपनिषद ब्रह्मप्राप्तीचा /मोक्ष मिळवण्याचा मार्ग दाखवतात. कठ उपनिषदात नचिकेत जो यमाला भेटून मोक्षप्राप्तीचे ज्ञान मिळवतो अशी एक सुंदर कथा आहे. यम नचिकेताला ब्रह्मन्, आत्मन्, जन्म-मृत्यू चक्र, मोक्ष या संकल्पना खूप छान पद्धतीने समजावून सांगतो आणि त्यामुळे त्याचे समाधान होते.

2. शारीरिक संपदा मिळवणे – शिस्तबद्ध जीवन, योग, व्यायाम, आहार-विहार, संतुलित जीवन पद्धती, संयम सुदृढ मन आणि शरीर तयार होते. शिक्षण पद्धतीत याचे योग्य ते भान राखले जात होते. सूर्योदयापूर्वी उठून आन्हिके उरकल्यावर रोज एक तास, योग, प्राणायाम, व्यायाम, ध्यान यासाठी दिला जात असे.

3. चारित्र्य निर्माण – इच्छाशक्तीचा विकास, मनावर नियंत्रण, सकारात्मक विचार करण्याची सवय लावणे, सत्याची कास धरणे, नैतिकतेचे कठोर पालन यातूनच चारित्र्य निर्माण होते. उपनिषदातील कथा आपल्या मनात याच गोष्टी बिंबवत असतात.

4. व्यक्तिमत्त्व विकास – शिक्षणाने फक्त भौतिक विकास व्हावा, प्रगती व्हावी एवढेच अपेक्षित नाही. मनुष्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास शिक्षण पद्धतीने व्हावा असे अपेक्षित आहे. शारीरिक कष्टाची सवय व्हावी, मनावर आणि इंद्रियांवर संयम ठेवता यावा, भौतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक प्रगती व्हावी याचे प्रशिक्षण या पद्धतीत दिले जायचे. गुरुकुलात शिक्षण घेणारा विद्यार्थी यातून तावून सुलाखून एक परिपूर्ण व्यक्ती होऊन बाहेर पडायचा.

5. वैयक्तिक आणि सामाजिक उद्दिष्टय़े – शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्टय़ा सुदृढ असलेली व्यक्ती ही सामाजिक बांधिलकी मानणारी असेल तर देशाचा उत्कर्ष होतो. उपनिषदात वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजहित जास्त महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही सत्यप्रिय आणि सदाचारी असावी. हे नैतिक शिक्षण उपनिषदातील शिक्षणाचा प्रमुख भाग आहे.

वेदमनूच्याचार्यो न्तेवासिनमनुशास्ति । सत्यं वद । धर्मं चर । स्वाध्यायान्मा प्रमदः । आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजानन्तुं मा व्यवच्छेसीः । सत्यान्न प्रमदितव्यम् । धर्मान्न प्रमदितव्यम् । कुशलान्न प्रमदितव्यम् । भूत्यै न प्रमदितव्यम् । स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् ।।(तैत्तिरीय उपनिषद्, शिक्षावल्ली, अनुवाक 11, मंत्र 1)

खरे बोलावे, धर्माचे आचरण करावे, स्वाध्याय कधीही चुकवू नये. सत्य, धर्म हे कधीही चुकवू नये. आपले काwशल्य ज्यात आहे अशी कामे चुकवू नये, ऐश्वर्य देणारी कार्ये सतत करावीत, त्यांची अवहेलना करू नये.

देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । मातृदेवो भव । पितृदेवो भव । आचार्यदेवो भव । अतिथिदेवो भव । यान्यनवद्यानि कर्माणि । तानि सेवितव्यानि । नो इतराणि । यान्यस्मापं सुचरितानि । तानि त्वयोपास्यानि ।।(तैत्तिरीय उपनिषद्, शिक्षावल्ली, अनुवाक 11, मंत्र 2)

देवकार्य आणि पितृकार्य यात काहीही कमतरता राहू नये, याची अवहेलना करू नये, आई हेच सर्वप्रथम देवता आहे, पिता देवतास्वरूप आहे, गुरू देव आहे. अतिथी देव आहे. म्हणजेच आई, पिता, आचार्य, अतिथी या सर्वांचा आदर करावा. त्याची श्रद्धापूर्वक सेवा करावी. जे कुकर्म आहे, निंद्य आहे ते टाकून द्यावे, जे वंदनीय आहे, चांगले कर्म आहे ते सतत करावे.

समर्थ रामदास त्यांच्या मनाचे श्लोकात म्हणतात – जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे.

6. आध्यात्मिक विकास – यज्ञ-यागादि कर्मे करणे, कर्मकांड, भक्ती, यातून आध्यात्मिक विकास होतो. कठोपनिषद अंतर्मुख होऊन आत्मज्ञानांकडे जाण्याचा मार्ग दाखवते.

7. सांस्कृतिक उद्दिष्टय़े – उपनिषदांचा भर हा मूल्यशिक्षणावर होता. सत्य, धर्म, शुचिता, अस्तेय, अपरिग्रह ही मूल्ये जीवनाचा पाया आहेत. अतिथी सत्कार हा महत्त्वाचा असे. पंच महायज्ञ हा सामाजिक संस्कृतीचा प्राण होता. जीवनमूल्ये आणि जीवन काwशल्ये शिकवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. त्यातील व्यवहार्य भाग, भौतिक, सामाजिक उन्नतीचे शिक्षण हा भाग सध्या जास्त अमलात आणला जातो, पण मनुष्याची प्रगती ही अशी एकांगी नसते. व्यक्तिमत्त्वाचा आधार हा नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि इदं न मम असा मानणारा असावा, तरच ते सर्वांगीण व्यक्तिमत्त्व ठरते.

(लेखिका पुरातत्वशास्त्राच्या प्राध्यापक आहेत)

– [email protected]