अंधेरी पीएमजीपीतील रहिवाशांना हवेय 500 चौरस फुटांचे घर, म्हाडाकडे केली मागणी

वरळी बीडीडीच्या धर्तीवर पुनर्विकासात 500 चौरस फुटांचे घर द्यावे तसेच पुनर्विकास होईपर्यंत दरमहा 25 हजार रुपये भाडे देण्यात यावे, अशी मागणी अंधेरी पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांनी म्हाडाकडे केली आहे.

अंधेरी पीएमजीपी या वसाहतीत चारमजली 17 इमारती आहेत. यात 942 निवासी व 42 अनिवासी अशा एपूण 984 गाळेधारकांचे वास्तव्य आहे. 1990-92 दरम्यान उभारलेल्या या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत आहेत. शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे या वसाहतींचा पुनर्विकास आता म्हाडाच्या माध्यमातून होणार आहे. गृहनिर्माण विभागाने यासंदर्भात कार्यादेशदेखील जारी केले आहे. हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावा यासाठी नुकतीच म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांच्यासह स्थानिक रहिवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सर्व रहिवाशांना 25 हजार रुपये भाडे आणि शिफ्टिंग चार्जेस द्यावे, 180 चौरस फुटांचे घर असलेल्यांना 500 चौरस फूट तर 270 चौरस फुटांचे घर असलेल्यांना 672 चौरस फुटांचे घर द्यावे, दोन ते तीन मजली भूमिगत वाहनतळ उभारावे, ट्रान्सफर शुल्क रद्द करावे, बालवाडी, समाजमंदिर, सोसायटी कार्यालय, विश्रामगृहे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रहिवाशांच्या वतीने आमदार बाळा नर यांनी केली.

शिवसेनेमुळे पुनर्विकास मार्गी

अंधेरीतील पीएमजीपी वसाहतीत वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी विकासक कार्यक्षम नसल्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास करून रहिवाशांना दिलासा द्यावा, असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26 मे 2022 रोजी म्हाडाला दिले होते. त्यानुसार या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून होणार आहे.

शासनाकडे प्रस्ताव पाठवणार

रहिवाशांच्या बहुतेक मागण्यांना म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच 500 चौरस फुटांचे घर आणि 25 हजार रुपये भाडे या मागण्यांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रहिवाशांच्या या मागण्यांसंदर्भात आपण लवकरच गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता यांची भेट घेणार असल्याचे बाळा नर यांनी सांगितले.