डॉक्टरांच्या मास्क लावण्याच्या सूचनेतून गैरसमज, कोरोनाच्या भितीने एकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
andhra-man-kills

कोरोना व्हायरसची (Covid 19) भिती जगभरात पसरली आहे. याविषयीचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. मात्र कोरोनाच्या भितीने मनात घर केलेल्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आपल्यामुळे हा आजार पसरू नये म्हणून आत्महत्या केल्याचे समोर आले असून आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

चित्तूर जिल्ह्याच्या थोट्टमबेडू गावातील बालाकृष्णैया यांना वाटले की त्यांना कोविड 19 (Covid 19) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. यावर कोणताही उपचार नाही. त्यामुळे आपल्या आईच्या थडग्याजवळ असलेल्या एका झाडाला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

54 वर्षाच्या बालाकृष्णैया हे शनिवार रुइया सरकारी रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांना यूरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असल्याचे कळाले. पण डॉक्टरांशी बोलताना झालेल्या गैरसमजुतीतून त्यांना कोविड 19 (Covid 19) कोरोना व्हायरस (Coronavirus)ची लागण झाली असल्यासारखे वाटले.

बालाकृष्णैया यांच्या मुलाने माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, ‘मी वडिलांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शांत बसायचे. त्यांचे शिक्षण फार नसल्याने डॉक्टर काय म्हणताहेत हे त्यांना समजले नाही. आपल्याया कोरोनाची लागण झाल्याची त्यांची ठाम समजूत झाली होती.’

शनिवारी रुग्णालयातून परतल्यावर ते विचित्र वर्तन करत होते, अशी माहिती देखील त्यांनी दिली. डॉक्टरांनी त्यांना इन्फेक्शन असल्याने मास्क लावण्यास सांगितले होते. मात्र त्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा त्यांना संशय होता. अखेर रोग पसरू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.

दरम्यान, कोरोना बद्दलची चुकीची माहिती पसरू नये यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे 44,318 लोक आजारी आहे. तर 1110 लोकांचा मृत्यू झाला आहे.