आंध्रात गरीब भाजीविक्रेता बनला नगरपालिकेचा नगराध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणाचे नशीब कधी आणि कसे उघडेल याचा अंदाज कुणालाच नसतो. पण त्यासाठी सबुरी आणि जिद्दीची गरज लागते हे मात्र खरे. आंध्र प्रदेशच्या रायचोटी नगरपालिकेचा नगराध्यक्ष बनण्याचा बहुमान असाच फुटपाथवर भाजी विकणाऱ्या शेख बाशा यांना लाभला आहे.

आंध्रातील वायएसआर काँग्रेस पक्षाकडून शेख यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. गुरुवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी रायचोटी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून शेख बाशा यांच्या नावाची निवड केली. शेख यांच्यासाठी हा अनपेक्षित धक्काच होता. आपण ज्या नगरपालिकेतील रस्त्यावर बसून भाजी विकतो त्याच नगरपालिकेचे नगराध्यक्षपद आपल्याला मिळाले यावर क्षणभर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पदवीधर होऊनही शेख यांना नोकरी न मिळाल्याने त्यांनी फुटपाथवर भाजी विकून आपले घर चालवण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री जगनमोहन यांची शेख यांच्यावर नजर पडली आणि या गरीब भाजीविक्रेत्याचे नशीबच पार पालटले.