
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील मसुरे येथील आंगणेवाडीमधील भराडी देवीच्या यात्रेला असंख्य भक्तांचा महासागर उसळला. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी होणाऱया या यात्रेत नियमांचे काटेकोर पालन करून नेते मंडळींसह भाविकांनी दर्शन घेतले. ‘जय जय भराडी देवी’च्या गजराने या वेळी परिसर दुमदुमून गेला.
11 विविध रांगांमधून भाविकांना देवीचे दर्शन दिले जात आहे. मंदिर गाभाऱयात आकर्षक फुलांची आरास मनमोहक ठरली. ‘जय जय भराडी देवी’च्या गजराने आंगणेवाडी परिसर दुमदुमून गेला. आंगणे कुटुंबीय, पोलीस, महसूल, ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासन भाविकांना सुलभ व्यवस्था मिळावी यासाठी सेवा बजावत आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक, दीपक केसरकर, रमेश कोरगावकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह अन्य नेतेमंडळी शिवसेना पदाधिकारी, नेतेमंडळी, टीव्ही कलाकार दिगंबर नाईक, भूषण कडू यांसह अन्य महनीय व्यक्ती यांनी देवीचे दर्शन घेतले.
प्रसादाच्या सोहळय़ाला गर्दी
मालवणी खाजा व प्रसादाच्या दुकानातही भाविकांची गर्दी दिसून येत आहे. हॉटेलमध्येही गर्दी होती. खेळणी, चादरी व अन्य साहित्य दुकानेही सजली होती. रात्री देवीला प्रसाद लावणे सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सायंकाळी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
आंगणेवाडीतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार
आंगणेवाडीत पुरेशा पाण्याची सोय करून पुढील यात्रेपूर्वी येथील पाणी प्रश्न निकाली काढणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. तसेच अन्य काही समस्या असल्यास तसेच अधिक सोयीसुविधा द्यायच्या असतील तर राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवल्या जातील, असे खासदार राऊत म्हणाले.

































































