
मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी आंगणेवाडी नगरी नटूनथटून सज्ज झाली असून, लाखो भाविकांनी देवीसमोर दंडवत घालून नवसाची पूर्तता केली. भक्तगणांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन सज्ज झाले होते.
भक्तांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळाने चोख नियोजन केले होते. आज पहाटे 3 वाजल्यापासून दर्शनाला व ओटी भरण्यास प्रारंभ झाला. रात्री 9 वाजता देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी दर्शन तात्पुरते बंद ठेवण्यात आले. मध्यरात्री 1 वाजता दर्शन पुन्हा सुरू होणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. उद्या मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. यावेळी मातेच्या दर्शनासाठी एकूण 9 रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. सुलभ दर्शन व्हावे यासाठी किमान कालावधी तसेच दिव्यांगांसाठी विशेष रिक्षा सेवा उपलब्ध करण्यात आली होती.
आकर्षक सजावट, बाजारपेठ सजली
यात्रेच्या पूर्वसंध्येला मंदिराचा गाभारा आणि सभामंडपात मनमोहक फुलांची आरास करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला. हे विलोभनीय रूप भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेनिमित्त खेळणी, खाद्यपदार्थ, भांडी आणि कपडय़ांची मोठी बाजारपेठ थाटण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतर्फे दरवर्षीप्रमाणे महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे.
आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या जत्रोत्सवानिमित्त राज्यभरातून येणाऱया भाविकांना शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्यावतीने मोफत बिस्लरी पाणी वाटप करण्यात आले. तसेच भाविक सहायता केंद्रात प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या केंद्राला शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, विभागप्रमुख सुरेश पाटील, नगरसेविका उर्मिला पांचाळ, नगरसेवक प्रमोद सावंत, युवासेना पदाधिकारी सुशांत नाईक आदींनी भेट दिली. या उपक्रमाचे आयोजन मलबार हिल विधानसभाप्रमुख अरुंधती दुधवडकर, हेमंत दुधवडकर यांनी केले.



























































