
नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिह्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव अर्थात आंगणेवाडीची जत्रा शनिवार 2 मार्च 2024 रोजी होणार आहे.
मंगळवारी सकाळी देवीचा कौल घेऊन जत्रोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आंगणे कुटुंबियांनी दिली. जत्रेची तारीख निश्चित झाल्याने मुंबई आणि परिसरातून मोठय़ा प्रमाणात जत्रेला येणारे भाविक तयारीला लागले आहेत. यंदा जत्रेक जावुकच व्हया म्हणत सुट्टी आणि तिकिटांची जुळवाजुळव कोकणवासीयांमध्ये सुरू झाली आहे.
10 लाख भाविक येणार
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा काwल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याचि देही याचि डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकाना केंद्रबिंदू मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे. अनेक व्यापारी, व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱया या यात्रोत्सवामध्ये मोठया प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.
अफवांना मिळाला पूर्णविराम
आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस यात्रेच्या तारीख निश्चितीबाबत अफवा पसरविल्या जात होत्या. प्रथेनुसार देवीला काwल लावून जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
28 डिसेंबरपर्यंत मंदिर बंद
जत्रेची तारीख जाहीर झाल्याने पूर्वतयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेची तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर 28 डिसेंबरपर्यंत धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे.


























































