
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवासाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. गुरुवार 24 फेब्रुवारी पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांना देवीचे दर्शन खुले होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे भव्य मंडप उभारला असून आकर्षक विद्यूत रोषणाई केली आहे. भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी 9 रांगांची व्यवस्था केली असून दिव्यांगांसाठी विशेष दर्शन रांग आहे.
कोरानाच्या पार्श्वभूमिवर भाविकांनी मास्क वापरावा, कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, आरोग्य पथके आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
एकावेळी 50 जणांनाच दर्शन
आंगणेवाडी आणि कुणकेश्वर येथील यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय बैठका पार पडली आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही डोस पूर्ण केलेल्या 50 जणांनाच एका वेळी दर्शन घेता येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
कुडाळ आगारातून बससेवा
भाविकांच्या सेवेसाठी कुडाळ एसटी आगारातून गुरुवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 4 बसमार्फत मर्यादित स्वरूपात फेऱया सोडल्या जाणार आहेत.































































