
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे. त्यासाठी विभागाने 40 कोटी 61 लाख 30 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील 1 लाख 10 हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांना होणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भाऊबीज भेट तत्काळ अदा करण्याबाबत कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.