लोकल लवकर आली म्हणून प्रवासी भडकले, गाडी पावणे तीन मिनिटे अडवून ठेवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साधारणपणे प्रवासी लोकल गाड्या वेळेवर धावत नसल्याने वैतागत असतात, मात्र मीरा रोड स्थानकात लोकल गाडी वेळेच्या आधी आल्याने प्रवासी संतापल्याचा प्रकार समोर आला आहे. ही गाडी वेळेच्या साडेतीन मिनिटे आधी पोहोचली होती. यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी गाडी रोखून धरली होती.

मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळी चर्चगेटला जाणारी लोकल मीरा रोड स्थानकात साडेतीन मिनिटे आधी पोहोचली होती. यामुळे प्रवासी भडकले आणि ते मोटरमन पी.एन.गुप्ता यांच्या केबिन बाहेर जमले. इंडिकेटरवर दिसणाऱ्या वेळेपर्यंत गाडी सोडायची नाही असा या प्रवाशांनी गुप्ता यांना दम दिला. यामुळे गुप्ता यांना 2 मिनिटे 45 सेकंट याच स्थानकात थांबवावी लागली. इतका सगळा गोंधळ होऊनही ही गाडी नियोजित वेळेच्या 45 सेकंद आधी स्थानकातून सुटली.

प्रवाशांच्या या गोंधळामुळे गुप्ता यांना रेल्वे प्रशासनाला उत्तरे द्यावी लागणार आहेत. मीरा रोड स्थानकात इतका वेळ गाडी का थांबवली याचे उत्तर देण्याचे आदेश गुप्ता यांना देण्यात आले. यावर गुप्ता यांनी त्यांच्यासोबत घडलेला सगळा प्रकार वरिष्ठांना सांगितला. त्यांनी वरिष्ठांना दिलेल्या उत्तरात म्हटलंय की विरार स्थानकातून त्यांनी सकाळी 7.57 वाजता लोकल ट्रेन काढली. ही लोकल भाईंदर स्थानकात वेळेच्या काही सेकंद आधी पोहोचली. मीरा रोड स्थानकात ही लोकल तब्बल साडेतीन मिनिटे आधी पोहोचली. या गाडीने नियमितपणे प्रवास करणारे आणि स्थानकात वेळेपूर्वी पोहोचलेले प्रवासी यामुळे भडकले होते. याच गाडीने प्रवास करणारे त्यांचे साथीदार आणि इतर प्रवासी येईपर्यंत गाडी सोडायची नाही असं म्हणत या प्रवाशांनी गोंधळ घातला आणि गुप्ता यांना ट्रेन थांबवून ठेवण्यास भाग पाडले.

प्रवाशांच्या भल्यासाठी गाडी वेळेपूर्वी स्थानकात पोहचवण्याचा प्रयत्न गुप्ता यांच्या अंगाशी आला आहे. रेल्वेच्या कामगार संघटनांनी गुप्ता यांचा बचाव करत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोटरमनकडून लेखी उत्तर मागवणे योग्य नाही असं म्हणतानाच रेल्वे प्रशासनाने त्यांच्याविरोधात कारवाई करणं योग्य नसल्याचं पश्चिम रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस जी.जी.माहूरकर यांनी मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.