व्यापाराला मंदीचा फटका; खर्चाला लगाम, अनिल अंबानी आलिशान विमान देणार भाडय़ाने

3666

मंदीच्या फेऱ्याने मोठमोठय़ा उद्योगपतींनाही अक्षरशः खड्डय़ात घातलेय. मंदीचा उद्योगांना प्रचंड मोठा फटका बसलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांनी आता आपल्या खर्चाला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर आपले एक आलिशान विमानही ते भाडय़ाने देणार आहेत. त्यांच्या रिलायन्स ट्रान्स्पोर्ट ऍण्ड ट्रव्हल्सने तीन बिझनेस जेटस्पैकी एक असलेले 13 सीटस्चे ग्लोबल-5000 हे विमान बंगळुरूतील एका जागतिक चार्टर कंपनीला भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

उद्योगात प्रचंड नुकसान होत असून आर्थिक संकटात सापडलेले उद्योजक उद्योग बंद करण्याच्या तयारीत आहेत. वायकिंग एव्हिएशनचे मालक सचिन जोशी यांच्याकडे आपली दोन विमाने चालवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. यापैकी एक विमान मुंबई विमानतळावर तर दुसरे नांदेड विमानतळावर आहे. चार महिन्यांपासून जोशी यांनी आपल्या कर्मचाऱयांना वेतनही दिलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अंबानींचे आवडते विमान
भाडय़ाने देण्यात येणारे विमान अंबानींचे अत्यंत आवडते विमान असून आपल्या प्रत्येक दौऱ्यात ते याच विमानाचा वापर करत होते. विमान उड्डाण नियामक मंडळाकडे असलेल्या नोंदींनुसार रिलायन्स ट्रान्स्पोर्टकडे आणखी दोन विमान आणि हेलिकॉप्टर आहेत.

नॉन शेडय़ुल्ड ऑपरेटर्सची संख्या घटली
अभिनेते आणि उद्योजक सचिन जोशी यांच्या विकिंग एव्हिएशन, इंडिया बुल्सच्या एअरमिड एव्हिएशन, लिगारे एव्हिएशन यांच्यावरही आर्थिक संकट घोंघावत असून ते आपली विमाने विकण्याचा विचार करत आहेत. नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील नॉन शेडय़ुल्ड ऑपरेटर्सची संख्या सातत्याने घटत चालली आहे. वर्षभरापूर्वी अशा विमानांची संख्या 130 होती. सप्टेंबरमध्ये ही संख्या 99 इतकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या