मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललाय, बसायला खूर्चीही मिळेना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाआघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चालला आहे. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच, असा टोला अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून लगावला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तीन पक्षाच्या सरकारमध्ये पदांसाठी संघर्ष सुरू असल्याची टीका केली होती. याला अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, राधाकृष्ण विखे पाटीलजी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खूर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललाय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच, असा टोला अनिल देशमुख यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.

काय घडले होते पत्रकार परिषदेत?

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसणार असल्याची आवई ठोकलेल्या अण्णा हजारे यांनी भाजप नेत्यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी राळेगणसिद्धी येथे त्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर अण्णांनी हा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील हे फडणवीस आणि अण्णा हजारे यांच्या मागे उभे असल्याचे दिसले. याचा फोटोही व्हायरल झाला होता आणि त्याचाच उल्लेख करत अनिल देशमुख यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला.