
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. खासदार डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये तेथील प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या नावाचा उल्लेख आहे. डेलकर यांनी महाराष्ट्र सरकारकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली असून या आत्महत्येचा तपास ‘एसआयटी’कडे सोपविण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली असून त्यांनी महाराष्ट्राकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांना न्याय मिळणार आहे की नाही, असा सवाल संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केला. त्याचप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डेलकर आत्महत्येमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. त्याचप्रमाणे विरोधकांकडून मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यासंदर्भात निवेदन करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात येईल, अशी घोषणा केली.
प्रफुल्ल खेडा पटेल होते गुजरातचे गृहमंत्री
दादरा नगर हवेली येथील प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल तसेच अधिकाऱयांकडून वारंवार दबाव टाकून त्रास दिला जात होता. त्याचप्रमाणे सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने आत्महत्या करतोय असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले होते. हे प्रफुल्ल खेडा पटेल गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना तिथे गृहमंत्री होते. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी तसेच चिरंजीव अभिनव डेलकर या दोघांनी पत्र दिलं असून त्यात त्यांनी प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांवर तेथील प्रशासकांकडून मोठय़ा प्रमाणावर दबाव असल्याचे त्यांच्या मुलाने आपल्या पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी महाराष्ट्रावर विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल, डेलकर कुटुंबीयांचा विश्वास
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी ‘एसआयटी’कडून केली जाईल अशी घोषणा केल्यानंतर डेलकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधान भवन येथे भेट घेतली. यावेळी मोहन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी महाराष्ट्र सरकार आम्हाला न्याय देईल, असा विश्वास व्यक्त केला.
मोहन डेलकर कुटुंबीयांनी अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी मोहन डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर, पुत्र अभिनव डेलकर व मुलगी उपस्थित होते. या डेलकर कुटुंबीयांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मोहन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 1989 पासून मोहन डेलकर हे संसदेचे सदस्य आहेत. इतका काळ संसद सदस्य असलेली व्यक्ती अशा प्रकारे आत्महत्येचा निर्णय घेते याचा अर्थ त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल, त्यांच्यावर किती दबाव टाकण्यात आला असेल याचा अंदाज येईल. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी मुंबई पोलिसांची एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सरकारने हे पाऊल उचलल्याने आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही अभिनव डेलकर यांनी व्यक्त केला.




























































