नारखेड तालुक्यातील बेलोना येथे धनगर समाजाच्या अरविंद बांबल या युवकाच्या वडिलोपार्जित शेळय़ामेंढय़ांच्या गोठय़ावर अतिक्रमण करण्यात येत होते. त्यामुळे मला मुदत द्या, मी स्वतःच अतिक्रमण काढतो अशी विनंती केली, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे व्यथित झालेल्या अरविंदने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली. या प्रकरणात स्थानिक भाजप नेत्याचा दबाव असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन त्यांनी आज पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार दिले.
अरविंदने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत बेलोनाने कोणतेही काम न करता बिल काढल्याचे प्रकरण समोर आणले होते. याचाच राग मनात धरून ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई केल्याची तक्रार कुटुंबीय, सामाजिक संघटना व नागरिक करीत आहेत. बांबलच्या आत्महत्येची चौकशी करावी, अशी मागणी देशमुख यांनी पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्याकडे केली. यावेळी अरविंदचे कुटुंबीयदेखील सोबत होते.