शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासात तज्ञांची मदत घ्या! अनिल देशमुख यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी 

शिक्षक भरती घोटाळय़ाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात असून, पोलीस जरी या गोष्टीचा तपास करत असले तरी त्यांना शिक्षण विभागात नेमकी भरती कशी होते याची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे पोलिसांनी तपास करताना शिक्षक विभागातील तज्ञांची मदत घ्यावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच समांतररीत्या या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांचा सायबर विभागसुद्धा करत आहे. या तपासात अनेक गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने शिक्षकांची भरती करताना अनेक खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. हा घोटाळा नियोजित पद्धतीने झाला असून यात शिक्षण विभागातील अधिकारी, संस्थाचालक व दलाल यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन नोकरी लावली आहे, असेही अनिल देशमुख यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

असा झाला घोटाळा… 

z महाराष्ट्रात 2 मे 2012 पासून शिक्षक पदभरती बंदी असताना विशेष बाब म्हणून बोगस पद्धतीने सरकारी स्तरावरून मान्यता आणून नियुक्त्या करण्यात आल्या.

z शासन निर्णय, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑगस्ट 2013 पासून निर्गमित असताना त्यापूर्वी डीएड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना फसवून बँक डेटमध्ये (टीईटी लागू व्हायच्या आधी) नियुक्त्या दाखवून सरकारची फसवणूक केली आहे.

z अनेक नियुक्त्यांमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वैयक्तिक मान्यता केल्या आहेत व त्याआधारे वेतन पथक अधीक्षक, शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या संगनमताने बोगस शिक्षक भरती घोटाळा सुनियोजित पद्धतीने करण्यात आला आहे.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नागपुरातील प्रत्येक तालुक्यात अनेक दलाल सक्रिय होते आणि त्यांच्या माध्यमातून भरती करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात अनेक तालुक्यातून दलालांची नावे माझ्याकडे आली असून त्यांची चौकशी केली तर अनेक गोष्टी समोर येतील, असेही देशमुख म्हणाले.