
देवेंद्र गंगाधर फडणवीस हा माणूस दगलबाज असून त्यांच्यावर स्वप्नातदेखील विश्वास ठेवू नका, असा वडीलकीचा सल्ला माजी आमदार अनिल गोटे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. गोटे यांनी शिंदे यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
अनिल गोटे यांनी शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच उद्धार केला आहे. त्यांनी पत्रात असे नमूद केले आहे की, ‘पाताळयंत्री, कपटी आणि खोटे बोलण्याचे अनन्यसाधारण अंगभूत गुण असलेल्या फडणवीस यांच्यावर मी विश्वास ठेवला होता. चुकूनसुद्धा ते दगलबाजी करणार नाहीत असे वाटले होते. पण फडणवीस यांनी त्यांच्यासारख्याच भ्रष्ट व दुराचारी मित्रांचा आत्मा संतुष्ट करण्यासाठी माझ्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला. हा अन्याय कबूल करण्याचा प्रामाणिकपणाही त्यांच्याकडे नाही.’
आपल्या मनातील या भावना स्पष्टपणे पत्रात मांडतानाच अनिल गोटे यांनी ‘परमेश्वर अशा पशुतुल्य राक्षसी संकटापासून तुमचे रक्षण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना’ असे पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
































































