
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदुकीचा परवाना दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत गँगस्टरला शस्त्रपरवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच कारवाई केली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही परब यांनी दिला.
महाराष्ट्र राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे अनेक कारनामे आतापर्यंत जनतेसमोर ठेवले आहे. पुराव्यांसकट सगळी प्रकरणं जनतेसमोर आणि विधिमंडळात ठेवल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अशी काय अडचण आहे की प्रत्येक वेळेला त्यांना पाठीशी घातले जाते. त्यांना अभय दिले जाते? असा सवाल परब यांनी केला.
परब पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या समेत जाऊन सांगितले होते की, योगेश तुझ्या पाठीशी मी आहे. तुला काय काळजी करायचे कारण नाही. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पाठीशी आहे अशी भावना तयार झालेल्या गृहराज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात थैमान घातल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. कुविख्यात गुंड आणि महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजूर केला आहे. पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही योगेश कदम यांनी त्याला शस्त्र परवाना दिला.
सचिन घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हे होते. पोलिसांनीही याबाबत अहवाल दिला होता. पण न्यायालयाने पुराव्या अभावी सुटका केल्याचा दाखला देत योगेश कदम यांनी त्याला शस्त्र परवाना दिला. उद्या नीलेश घायवळ याला आणि दाऊद इब्राहीम यालाही न्यायालयाने पुराव्या अभावी सोडले तर त्यालाही शस्त्र परवाना देणार का? असा सवाल अनिल परब यांनी केला.
पुणे पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले, पण त्यांचे नितीधैर्य खच्ची करण्याचे काम गृहराज्यमंत्र्यांनी केले. पोलिसांचे आदेश रद्दबातल ठरवत नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिला. अशा लोकांना मुख्यमंत्री किती दिवस वाचवणार आहेत. जे आईच्या नावाने डान्सबार चालवतात, मुलीला नाचवून भाड खाताहेत, दलालीचे पैसे खाताहेत, गँगस्टर लोकांना पोसताहेत, त्यांना अधिकृत शस्त्र परवाना देताहेत. एका बाजुला मुख्यमंत्री स्वत:ची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करताहेत आणि गृहराज्यमंत्री त्यांच्या प्रतिमेवर दररोज चिखल फेकताहेत. अशा मंत्र्यांच्या मांडीला मांडू लावून बसण्यास त्यांची काय अडचण आहे? जनतेलाही याचा वीट आला असून कारवाई केली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असून अशा मंत्र्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. याबाबत अधिवेशनातही आवाज उठवणार असून त्याआधी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा परब यांनी दिला.
पुणे जिल्ह्यात गँगवॉर सुरू आहे. जिल्ह्यात 70 गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडोखेरी, खुनाचे प्रयत्न असे प्रकार तिथे सर्रास घडताहेत. यास सरकारचे आयते पाठबळ मिळतेय. त्यात आता पोलिसांनी परवाना नाकारल्यानंतरही असा परवाना दिल्याची मेहरबानी होत असेल तर ती दोनच कारणासाठी होऊ शकते, एक पैशासाठी दुसरी आम्ही तुम्हाला मदत करतो, ज्या सुपाऱ्या देऊ त्या फोडा, असा आरोपही परब यांनी केला.