
रामदास कदम यांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतले. जाळून घेतले की तिला जाळले? याची नार्को करण्याचे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिले. ते शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
रामदास कदम यांनी खेडमध्ये कुणाला बंगले बांधून दिले, त्या बंगल्यावरून काय राजकारण, गोंधळ झाला हे सगळे नार्को टेस्टमध्ये आले पाहिजे. जर नार्को टेस्टला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे. गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. 1993 मध्ये बापाने काय उद्योग केलेत याची त्याने चौकशी केली पाहिजे. 1993 ला गृहराज्यमंत्र्यांची आई ज्योती कदम यांनी स्वत:ला जाळून घेतले होते. त्या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही परब यांनी केली.
अनिल परब पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचा मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचे मृत्युपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचे मृत्युपत्र मला माहिती आहे. हे जे आरोप करताहेत त्यांनी मला विचारावे. त्याच काय आहे, त्याला ठसे लागतात का हे मला माहिती आहे. कारण मेलेल्या माणसाचे ठसे घेतली तरी त्याचा काही उपयोग नसतो. रामदास कदम यांचे ज्ञान एवढे कच्चे आहे. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विष कालवायचं, घृणा तयार करायची यासाठी हा नीचपणा सुरू आहे.
शिशुपालाचे 100 अपराध झालेले असून येत्या अधिवेशनामध्ये पुराव्यासह सगळी प्रकरणं समोर आणणार आहे. डान्सबार चालवताहेत, वाळू चोरताहेत, दादागिरी करून जमिनी ढापताताहेत, लोकांना बेघर करताहेत. तसेच त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली. का केली याचा शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. खेडमध्ये दारू पिऊन जो धुमाकूळ सुरू आहे त्याची वाच्यता अधिवेशनात होईल. मुख्यमंत्र्यांना स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल तर अशा मंत्र्यांना हाकलून दिले पाहिजे. हे मंत्रीमंडळातील नासके आंबे आहेत, असा घणाघात परब यांनी केला.
रामदास कदमांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार, रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवणार!- अनिल परब
बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्युबद्दल तुम्ही शंका व्यक्त करताय? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? रामदास कदमची अक्कल गुडघ्यात आहे. त्यांनी बोलताना विचार करायला पाहिजे. रामदास कदम खोटे सांगत आहेत, म्हणून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत आहे. माफी मागावी लागेल, नाही तर कोर्टाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही परब यांनी ठणकावले. तसेच बाळासाहेबांच्या मृत्युचे राजकारण केले जात आहे. पक्ष चोरून पाहिला, माणसं चोरून पाहिले आणि आता बाळासाहेबांच्या मृत्युचे राजकारण करून उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र दर्शवायचा प्रयत्न सुरू असल्याची टीका परब यांनी केली.