प्राणी दात घासत नाहीत तरीही त्यांचे दात किडत का नाहीत? ही आहेत कारणं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोज सकाळी उठल्यावर आपण जी गोष्ट न चुकता करतो ती म्हणजे दात घासणे. टूथब्रश, टूथपेस्ट, टंग क्लिनर, माउथ फ्रेशनर, डेंटल फ्लॉस अशा विविध प्रकारांनी आपण दात स्वच्छ ठेवतो. तरीही आपल्याला कधीतरी दाताच्या डॉक्टरकडे जावंच लागतं. दात किडले असतील तर तसे उपचार घ्यावे लागतात.

पण कधी विचार केला आहे का की प्राण्यांचे दात का किडत नाहीत? प्राणी दात घासत नाहीत, तरीही त्यांना दातांच्या समस्या होत नाहीत. असं का? कोरा या प्रश्नोत्तराच्या वेबसाईटवर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

प्राण्यांचे दात किडत नाहीत कारण, प्राण्यांचे जिभेचे चोचले माणसाएवढे नसतात. कोणतीही प्रक्रिया न करता प्राणी कच्च अन्न सेवन करतात. प्राणी कच्चे जास्त फायबर असलेलं अन्न, ताजी फळं खातात. याने आपोआप तोंड स्वच्छ होते.

आपल्या आहारात गोडाचा समावेश असतो. चिकट गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या तोंडात एस म्युट्न नावाच्या बॅकटेरिअल प्रजातीचं प्रमाण वाढून दात किडतात. तसंच मानवी आहारातील साखर ही दातांच्या आरोग्याची शत्रू असते. त्याखेरीज मानवाला जडलेली घातक व्यसनं दातांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

अनेक प्राण्यांच्या तोंडातील पीएचची पातळी ही नैसर्गिकतःच जास्त असते. त्यामुळे त्यांना दाताच्या समस्या उद्भवत नाहीत. काही प्राण्यांमध्ये दातावर फ्लोराईडचा थर असतो. उदा. शार्क मासा. त्यामुळे त्यांचे दात किडत नाहीत. तर काही प्रजातींमध्ये अनेकदा दात पडून पुन्हा येतात. त्यामुळे प्राण्यांचे दात किडत नाहीत.