
पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या खारगे समितीने आपला अहवाल गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात ठेवला. त्यात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यासह इतर भागीदार म्हणून उल्लेख करत पार्थ पवार यांच्यावरही ठपका ठेवला आहे.
खारगे समितीने या प्रकरणात अमेडिया पंपनी दोषी असल्याचे नमूद केले आहे. तसेच हे प्रकरण फौजदारी कारवाईसाठी गृह खात्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
मुंढवा येथील जमीन विकणारी आणि विकत घेणारी व्यक्ती दोन्ही दोषी आहेत असे समितीने म्हटले आहे. अहवालात उल्लेख असलेल्या ‘इतर भागीदार’ या शब्दांत पार्थ पवार यांचा समावेश होतो. शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांना ‘नोटराईज्ड पॉवर ऑफ अॅटर्नी’ दिल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
अमेडिया पंपनीत दिग्विजय पाटील यांची 1 टक्क्याची भागीदारी आहे. बाकी 99 टक्के भागीदारी पार्थ पवार यांची आहे. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो तर पार्थ पवार यांच्यावरही दाखल व्हायला हवा. आता मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यासाठी निर्देश द्यावेत. मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये, राजकारणासाठी जर मुख्यमंत्री सरकारच्या जमिनी या लोकांच्या घशात घालण्याचे ठरवणार असतील तर खपवून घेणार नाही, असा इशाराही दमानिया यांनी दिला.


























































