
मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या बॅगेत कपडे असल्याचं संजय शिरसाटांनी यांनी म्हटलं आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत शिरसाट यांना सुनावलं आहे. चक्क पैसे दिसत असताना कपड्याची बॅग असेल असं कसं म्हणू शकतात? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.
अंजली दमानिया यांनी ट्विटरवर (X) एक व्हिडीओ पोस्ट करत संजय शिरसाटांना आव्हान दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ” मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात? मी त्या व्हिडीओला झूम करून फोटो काढला आहे. “हा माझ्या घरचा व्हिडीओ आहे” असे ते म्हणत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल आणि ते खरं बोलत असतील तर, आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावे की, जी रूम व्हिडीओमध्ये दिसत आहे ती खरंच त्यांच्या घरची आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच कोणाच्याही बेडरूममध्ये CCTV लावणं अतियश चुकीचं आहे, असंही दमानिया म्हणाल्या.
मला संजय शिरसाटांची कमाल वाटते.
बॅग मधे चक्क पैसे दिसत असतांना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात ? मी त्या विडिओला झूम करून फोटो काढला आहे.“हा माझ्या घरच्या वीडियो आहे “ असे ते म्हणत आहेत… त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी… pic.twitter.com/ZluMlMLf2A
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 11, 2025
संजय राऊत यांनी ट्विटरवर (X) एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांच्या नोटांची बंडलं ठेवलेली बॅग दिसत आहे. मात्र, संजय शिरसाटांनी व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या बॅगमध्ये कपडे असल्याचं म्हटलं आहे.