तिहार तुरुंगात कुख्यात गुंडाचा मृत्यू, कैद्यांमधील हाणामारीत जीव गेल्याचा पोलिसांचा दावा

दिल्लीतील तिहार जेलमध्ये कैद असलेल्या एका कुख्यात गुंडाचा मृत्यू झाला आहे. अंकीत गुर्जर असं या गुंडाचं नाव असून बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला होता. बरॅक नंबर 3मध्ये अंकीतचा मृतदेह सापडला होता. अंकीतच्या घरच्यांनी आरोप केला आहे की अंकीतचा खून करण्यात आला. तर अंकीतचा मृत्यू हा कैद्यांच्या हाणामारीत झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अंकीतवर 8 पेक्षा अधिक खून केल्याचा आरोप असून त्याच्या डोक्यावर बक्षिस होतं.

मंगळवारी झडतीदरम्यान तुरुंग अधिकाऱ्याला अंकीतकडे मोबाईल सापडला होता. यावरून दोघांत वाद झाला होता आणि या दोघांमध्ये झटापट झाली होती असा आरोप अंकीतच्या घरच्यांनी केला आहे. यानंतर अंकीतला पोलिसांनी बेदम मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला असं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून त्यांनी म्हटलंय की अंकीतचा मृत्यू हा कैद्यांच्या हाणामारीत झाला आहे. दिल्ली पोलिसांनी अंकीतचा मृतदेह दिनदयाळ रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.

दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी अंकीतला अटक केली होती. दिल्ली आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात त्याने मोठी दहशत निर्माण केली होती. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी त्याच्या डोक्यावर सव्वालाखाचे इनाम ठेवले होते. दिल्लीवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अंकीत गुर्जर आणि रोहित चौधरी नावाच्या गुंडाने हातमिळवणी केली होती. मात्र यानंतर काही दिवसांतच अंकीतला अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या