लोकपालसाठी अण्णांचे २ ऑक्टोबरपासून उपोषण

anna-hazare

सामना प्रतिनिधी । नगर

भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्तान करणार अशी घोषणा करुन भाजपने सत्ता मिळवली. मात्र, आता भाजपप्रणीत केंद्र सरकार लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे आपण २ आक्टोबरपासून राळेगणसिध्दी येथे उपोषणाला बसणार असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपालची नियुक्ती हे महत्त्वाचे पाऊल होते. मात्र सरकार लोकपालाची नियुक्ती करत नाही यासारखे दुर्देव नाही. सत्तेत येऊन चार वर्षे उलटल्यानंतरही सरकारने दिलेले लोकपालाच्या नियुक्तीचे आश्‍वासन पाळलेले नाही. सरकार आता शोध समितीची सबब पुढे करुन लोकपालची नियुक्ती टाळत आहे. चार वर्षात सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. चार वर्षात त्यांना नियुक्त्या करणे काही अडचणीचे नव्हते. पण सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोनदा लोकपाल नियुक्तीबाबत सरकारला सुनावले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकार लोकपाल नियुक्तीसाठी टाळाटाळ करत आहे असे अण्णांनी म्हटले आहे

१९९६ पासून आतापर्यंत ८ वेळा संसदेत हे विधेयक ठेवण्यात आले आहे. परंतु यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पंतप्रधानांचे अंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनीक सुव्यवस्था, अण्विक उर्जा आणि अंतराळासंबंधी माहितीही लोकपालच्या कक्षेत येते. तसेच लोकपाल कायदा केल्यावर त्यात पंतप्रधानांचाही समावेश होत असल्यामुळेच सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोपही अण्णांनी केला. भ्रष्टाचार रोखण्यासाठी अद्यापही ठोस निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे आपण २ ऑक्टोबरपासून राळेगणसिध्दी येथे उपोषणास बसणार असल्याचे अण्णांनी सांगितले.