लोकपालसाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात

सामना प्रतिनिधी । मुंबई

केंद्रातील भाजप सरकारला देशातील भ्रष्टाचाराला आळा घालायची इच्छा नाही. म्हणून सरकार पुन्हा पुन्हा लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप करत महात्मा गांधींच्या जयंतीला, २ ऑक्टोबरपासून लोकपालसाठी पुन्हा मैदानात उतरणार आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे.

नगरमधील राळेगणसिद्धी येथे महात्मा गांधींच्या जयंतीला आपण उपोषणाला बसणार आहोत. लोकांनीही भ्रष्टाचाराविरोधी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एनडीए सरकारने सत्तेत येण्याआधी लोकपाल कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे म्हटले होते. त्यानंतर ते सत्तेत आले. संसदेत लोकपाल कायदा संमत झाला. राष्ट्रपतींनी २०१४ साली त्यावर स्वाक्षरीही केली. पण तरीही केंद्रातील भाजप सरकार राज्याराज्यांत लोकपालांची नेमणूक केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना २०११ साली अण्णा हजारे यांनी १२ दिवसांचे उपोषण करून देशभरात भ्रष्टाचाराविरोधात रान उठवले होते. त्यावेळी सरकारने त्यांची ही मागणी तत्त्वतः मान्य केली होती.