लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची कन्या शांताबाईंचे निधन

लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या कन्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. कांदिवली येथील खाजगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शांताबाई या अण्णा भाऊंच्या लेखनाच्या साक्षीदार आणि पहिल्या वाचक असायच्या. बालवयापासून त्यांनी कम्युनिस्ट चळवळीला वाहून घेतले होते. त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दौलत नगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची लहान बहीण शकुंतला व भाचे, भाची असा परिवार आहे.

अण्णा भाऊंच्या द्वितीय पत्नी जयवंताबाई दोडके यांच्या शांता आणि शपुंतला या दोन लेकी. शांताबाई लहान वयापासूनच कम्युनिस्ट पक्षाच्या बाल संघाचे व तत्कालीन लाल बावटा कला पथकाचे काम करायच्या. नंतर त्या कम्युनिस्ट पक्षाचेही सक्रिय काम करीत होत्या. 1949 साली काही महिने त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. शांताबाई घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आईसोबत कुटुंबाची जबाबदारी सांभाळून कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनेचेही कार्य करायच्या. लाल बावटा कला पथकाचे प्रमुख शाहीर अमर शेख व शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या कलापथकात नंतर त्यांनी काम केले. त्यांना उतारवयात कलावंतांना मिळणारी शासकीय पेन्शन मिळविण्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागला व त्रास सहन करावा. परंतु त्यांनी आपला स्वाभिमान व कष्टकरी चळवळीशी असलेली बांधिलकी शेवटपर्यंत जपली.

लोकनाटय़ात काम

सत्तरच्या दशकात त्यांनी कॉ. दत्ता गव्हाणकरांच्या ‘काई चालं न गा’ या शाहीर नामदेव कापडे यांनी बसविलेल्या लोकनाटय़ात काम केले होते. तसेच ‘लोकमंच’ या संस्थेतर्फे ‘अकलेची गोष्ट’ हे शेतकऱयांच्या प्रश्नांवरील गाजलेले लोकनाटय़ 1986 साली रंगभूमीवर सादर केले होते, त्यामध्येही त्यांनी दिग्दर्शनसाह्य व भूमिकाही केली होती.