
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
मृत्यूचा सापळा समजल्या जाणाऱया बायपास रोडने आज पुन्हा एक बळी घेतला. भरधाव वेगाने जाणाऱया स्कॉर्पिओने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास सूर्या लॉन्ससमोरील सहारा सिटीसमोर घडली. बायपास रोडवरील 14 वर्षांतील हा शंभरावा बळी होय.
मुकुंदवाडी, शिवशाहीनगरातील भगवान गंगाधर शेळके (48) हे सहारा सिटीमधील एका गुत्तेदाराकडे नोकरीला आहेत. नेहमीप्रमाणे आज गुरुवारी ते दुचाकीवरून (एमएच 20 एएम 4847) बायपास सूर्या लॉन्सजवळील सहारा सिटीतील उद्यानात कामाला जात होते. सकाळी दहाच्या सुमारास सूर्या लॉन्ससमोरील दुभाजकाजवळून वळण घेत असताना पाठीमागून जालना येथून संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱया पांढऱया रंगाच्या स्कॉर्पिओने (एमएच 21 व्ही 2529) दुचाकीला जोराची धडक दिली. यात भगवान शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच चालकाने स्कॉर्पिओ सोडून पळ काढला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना एका वाहनाने उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल एस. एल. कोलते यांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. भगवान शेळके यांना दोन मुली व दोन मुले असून, दोन मुलींचे लग्न झाले आहे. एक मुलगा चालक आहे, तर दुसरा मुलगा शिक्षण घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहचून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उपायुक्त दीपाली घाडगे यांनी परिसरातील नागरिक तसेच व्यापाऱयांची बैठक घेतली होती. बैठकीत नागरिकांनी बायपास रोडवर सर्व्हिस रोड हाच पर्याय असल्याचे सांगितले होते.
14 वर्षांत शंभर जणांचे बळी
मृत्यूचा सापळा समजल्या जाणाऱया बायपास रोडवर अतिक्रमणे वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच बायपास रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रोडवर 14 वर्षांत तब्बल शंभर जणांचे बळी गेलेले आहेत. एका तरुण मेकॅनिकच्या मृत्यूनंतर खडबडून जाग्या झालेल्या पोलीस प्रशासनाने अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी तेथील नागरिकांची बैठक घेतली होती. बैठकीत नागरिकांनी अतिक्रमणे आणि सर्व्हिस रोड हाच पर्याय असल्याची भूमिका घेतली आहे.


























































