
सामना प्रतिनिधी । हडोळती
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची विक्रमी लागवड झाली असून शेतकऱ्यांनी १० जूनच्या आसपास कापसाची लागवड केली. मात्र पावसाची सतत होणारी उघडीप वातावरणातील बदल , बोंडअळी अशा अनेक संकटाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहीले आहे. कापसावर अचानकच मऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस सूकत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हंगरगा येथील शेतकरी संजय वसंतराव पवार यांनी त्यांच्या शेतामध्ये १० जून रोजी कापसाची लागवड केली असता चार फवारण्या केल्या. बुधवार पासून सुरू झालेल्या भिज पावसाने कापसाची कळा बदलून कापूस जोमात दिसू लागला. मात्र अचानक कापसाच्या झाडावरील पाने कोमेजू लागली आहेत. झाडावरील ताठरपणा कमी होऊन झाडे सुकू लागली आहेत . तसेच झाडावरील फुले व बोंडही सुकत आहेत या झाडावर पांढरा बुरशीजन्य रोग दिसत आहे . त्याच बरोबर उमरगा (रेतू) परिसरातील शेतकऱ्यांचा कापसावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे . आता कापसाची झाडे मरून जात असल्याने तोंडावर आलेल्या कापूस उत्पादनावर आणि अपेक्षे वर पाणी फिरते की काय अशी भीती येथील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
कृषी विभागाशी संपर्क साधला असत ढगाळ वातावरणनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामूळे बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव होतो असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.































































