
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार व हल्ले सुरूच असून बुधवारी आणखी एका हिंदू तरुणाची ठेचून हत्या करण्यात आली. सात दिवसांतील ही दुसरी घटना असून बांगलादेशातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अमृत मोंडाल ऊर्फ सम्राट असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. 29 वर्षीय सम्राट हा ढाक्यापासून चार तासांच्या अंतरावर असलेल्या राजभरी पांगशा येथील रहिवासी होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास गावकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला व त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
मागील आठवडय़ात ढाक्याजवळच्या एका गारमेंटमध्ये काम करणाऱ्या दीपू चंद्र दास नावाच्या व्यक्तीची जमावाने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह फासावर लटकवून तो जाळण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद हिंदुस्थानात उमटले होते.
पोलिसांचा खंडणीखोरीचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, अमृत मोंडाल ऊर्फ सम्राट हा एका गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या होता. ‘सम्राट वाहिनी’ नावाची संघटना तो चालवत होता. ही टोळी खंडणीखोरी व इतर कारवाया करत असे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर मागील वर्षी सम्राट बांगलादेशातून पळाला होता. काही दिवसांपूर्वीच तो परतला होता.




























































