
सामना ऑनलाईन, लातुर
मुलं पळवण्याच्या अफवा थांबण्याचे नाव घेत नसून या अफवेमुळे अजून एका व्यक्तीचा मृत्यू ओढवला आहे. लातूरम्धील उद्गीरमध्ये जमावाने मुले चोरणारी समजून चार तरुणांना बेदम चोपले. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून या मारहाणीत पोलिसही जखमी झाले आहे. महमद आझम मृत व्यक्तीचे नाव आहे.
हैद्रबादहून चार मित्र मिळून जीपने उदगीर जवळच्या कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या हंडीखेर गावात मित्राला भेटायला आले होते. मित्राला भेटून झाल्यावर ते मुर्की मार्गे बिदरला निघाले. वाटेत एका तांड्यावर शाळकरी मुले रस्त्यावर थांबली होती. या मुलांना त्यांनी चॉकलेट दिले आणि पुढे निघाले. तेवढ्यात कोणी तरी हे लोक मुलं पळविणारी आहेत अशी अफवा सोशल मीडियावर सोडली. तसेच फोन करून पुढच्या गावात गाडी अडवून मारायला सांगितले. लोकांनी रस्त्यावर लाकडं टाकून रस्ता अडवला, जीप मुर्की गावात पोहंचल्या बरोबर लोकांनी कसलीही विचारपूस न करता गाडीवर दगडफेक सुरु केली. त्यामुळे घाबरलेल्या जीप मधल्या तरुणांनी गाडी वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण जीप भरधाव वेगात पुलावरून खाली कोसळली.
पुलावरून जीप कोसळल्या नंतर कोणीही जीपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढायचा विचार जमावाने केला नाही. ऊलट जीपवर अमानुष दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. संतप्त जमावातील काही माथेफ़िरूंनी जीप मधून एका तरुणाला काढून बांधून मारले. या मारहाणीत आणि जीप कोसळल्याने जखमी झाल्याने हैद्राबादच्या बारकास भागात राहणाऱ्या महंमद आजम या ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर इतर तिघे महंमद शहा आलम हा गंभीर जखमी झाला आहे. समीर आणि जावेद या दोघांना हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातला महंमद शहा आलम हा कतार येथून भारतात मित्रांना भेटायला आला होता, या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून तर कमालनगर पोलिसांचे तीन कर्मचारी आणि उपनिरीक्षक देखील जखमी झाले आहेत.






















































