व्यावसायिकाचे पैसे घेऊन पळालेला आणखी एक ताब्यात

व्यावसायिकाचे दहा लाख रुपये घेऊन पळ काढल्याप्रकरणी आणखी एकाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. रवी शंकर सिंग असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने अटक आरोपीची संख्या चार झाली आहे. सिंगला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदिवली येथे राहणारे  तक्रारदार हे कपडे खरेदीसाठी गुजरातला जात होते. सोमवारी ते वांद्रे टर्मिनस येथे आले. तेव्हा साध्या वेशातील दोन जण आले. त्याने ते पोलीस असल्याचे भासवले. बॅग तपासणीसाठी मागितली. बॅगेत काय आहे असे सांगून त्याने बॅग तपासली. बॅग तपासल्यानंतर ते पैसे घेऊन निघून गेले.

फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. या गुह्याचा तपास रेल्वेच्या गुन्हे शाखेला सोपवण्यात आला. पोलिसांनी तपास करून महिला पोलीस सह नीलेश कळसुळकर आणि प्रवीण शुक्लाला अटक केली. त्या तिघांच्या चौकशीत रवी सिंगचे नाव समोर आले. रवी सिंग हा गुरुवारी दादर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रवी सिंगला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या चौकशीत आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. रवी हा इस्टेट एजंट असून त्याने ते पैसे कोणाला दिले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.