आता संपूर्ण मुंबईत कोरोना अँटीजन चाचणी, 15 मिनिटांत अहवाल

1068

कोरोना चाचणीचा अहवाल १५ मिनिटांत देणारी अँटीजन टेस्ट आता संपूर्ण मुंबईससाठी वापरली जाणार आहे. उत्तर मुंबईत रुग्णांचा वेगाने शोध लावण्यासाठी ही टेस्ट सुरू करण्यात आली होती. या चाचणीसाठी पालिकेकडे एक लाख कीट उपलब्ध असून आतापर्यंत उत्तर मुंबईत चार हजार किटचा वापर झाला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोरोनाची लक्षणे आढळल्यास घशातील स्वॅब घेऊन ‘आरटीपीसीआर’ टेस्टचा वापरच सर्वाधिक केला जातो. या चाचणीचा अहवाल येण्यासाठी किमान २४ तासांचा वेळ लागतो. मात्र उत्तर मुंबईत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने १५ ते ३० मिनिटांत चाचणी अहवाल देणारी अँटीजन टेस्ट सुरू केली. यामध्ये नाकातील स्वॅब घेऊन चाचणी केली जाते. यामुळे रुग्णांचा शोध वेगाने लागल्यामुळे पुढील कार्यवाहीदेखील वेगाने करता येऊन रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास मदत होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. आता मुंबईतील सर्व रुग्णालये, क्वारंटाइन सेंटर, कोरोना हेल्थ सेंटर अशा ठिकाणी या चाचणीचा वापर वाढवण्यात येणार असल्याचेही काकाणी म्हणाले.

झोन- ७ मध्ये ७५४ टेस्ट, २६ पॉझिटिव्ह

उत्तर मुंबईत वाढणारा कोरोना रोखण्यासाठी ‘मिशन झिरो’ अंतर्गत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार झोन-७मध्ये अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आल्या. यामध्ये आतापर्यंत आर दक्षिण कांदिवली – १९५, आर मध्य बोरिवली – २१४ तर आर उत्तर – दहिसरमध्ये ३४५ अशा एकूण ७५४ चाचण्या करण्यात आल्या. यामये ७२८ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २६ जण पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती झोन-७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.

कम्युनिटी हॉलमध्ये क्वारेंटाइन

कोरोनाचा प्रसार सध्या झोपडपट्टी भागापेक्षा रहिवासी सहकारी सोसाट्यांमध्ये जास्त होत असल्याचे समोर आले आले आहे. अशा परिस्थितीत संबंधित सोसायट्या जर आपला कम्युनिटी हॉल, सध्या बंद असलेली जीम अशा ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करू शकत असेल तर पालिकेकडून तशी परवानगी देण्यात येईल. यासाठी सोसायट्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहकार्य पालिकेकडून केले जाईल असेही काकाणी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या