खाण्याची कवितिक मैफल

625

>> शेफ विष्णू मनोहर

कवयित्री अनुराधा हवालदार. स्वयंपाक करताना पाककृती गाण्यातून मांडायची… वेगळाच वाटतोय ना प्रकार…

अनुराधा हवालदार कवयित्री, चित्रकार याचबरोबर अस्सल सुगरणसुद्धा आहेत. नुकतेच त्यांचे तीन कवितासंग्रह, ‘अनुदय’, ‘मनातले…पानावर’ आणि ‘कविता माझी सानुली’ प्रकाशित होत आहेत. जपानचा ’हायकू’ हा त्यांचा आवडता कविता प्रकार. अनेक मासिकांतून, दिवाळी अंकांतून त्यांचे लेख व कविता वाचण्यास मिळतात. त्या पहिल्या मराठी कवयित्री असतील की ज्यांनी मराठीत रॅप तयार केलं आणि हे आता मी टाइम्स म्युझिककरिता लवकरच रेकॉर्ड करणार आहे. यामध्ये पदार्थ करता करता त्या पदार्थांची रेसीपी रॅपद्वारे गात ती सादर कराणार आहे. याचे शब्दांकन आणि संगीत अनुराधाताईंनीच केले आहे. अशा या चतुरस्र विदुषीची माझी भेट महाराष्ट्राच्या ‘किचन क्वीन’ स्पर्धेत झाली. त्यावेळी त्या नागपूरचे प्रतिनिधित्व करीत होत्या.

अनुराधा यांना लंच डेटबद्दल विचारल्यावर त्यांनी मला लंच डेटकरिता त्यांच्या घरीच बोलवून घेतलं. घरी गेल्यावर त्यांचे पती हेमंत हवालदार आणि मुलगा प्रज्योत हसतमुखाने स्वागत करायला आले. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सरळ डायनिंग टेबलवर जेवायला आमंत्रित केलं आणि पदार्थ बघून पहिले बोलावं की जेवावं असा प्रश्न पडला? शेवटी मी माझ्या मनाचंच मानलं. मी प्रथम जेवणावर ताव मारला. जेवणात लेमन राइस, वडा सांबार, इडली, उकडीचे मोदक, बटाटेवडे असा वेगवेगळया प्रकारचा बेत होता.

जेवण करता करता गप्पांनाही सुरुवात झाली. मी त्यांना म्हटलं एकावेळी तुम्ही ही एवढी वेगवेगळी कामे कसं करता? तर त्या म्हणाले ही कामे वाटत नाहीत. कारण हे करायला मला आवडतं. मला नवनवीन रेसिपी इव्हेंट करायला आवडतात. आता जरी जेवणात समोर भिन्नभाषीय पदार्थ जरी दिसत असले तरी मला महाराष्ट्रीयन पदार्थ जास्त प्रमाणात आवडतात तेही ताजे. पुरणपोळी आणि उकडीचा मोदक ही माझी स्पेशालिटी. उपवासाची खिचडी दिवस-रात्र दिली तरी मी आनंदाने खाईन एवढी प्रिय आहे. नंतर त्या म्हणाल्या, एका कविसंमेलनाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही परदेशात गेलो त्यावेळी शाकाहारी जेवण मिळत नव्हते. मग काय करायचे असा प्रश्न आल्यावर एक युक्ती सुचली की, आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे त्या शेफला मराठी पदार्थ शिकवू. त्यामुळे आपले दोन्ही हेतू साध्य होतील आणि मग काय पुढचे तीन दिवस आम्ही तिथे मराठी खाद्यमहोत्सव साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. याशिवाय त्या हॉटेलवाल्यांनी अनुराधाताईंना एक छान भेटवस्तूसुद्धा दिली. त्यांना जेव्हा विचारलं की तुमच्या आवडीचं जेवणाचं ठिकाण कोणतं? तर त्यावर त्या म्हणाल्या. मूर्तिजापूरमधलं माझ्या आईचं घर आणि तिथंला साधा स्वयंपाक. माझ्या आईच्या हातचा पिठलं भात एकदा खाल्ला तर जन्मभर आठवण राहील. आईबरोबरच त्यांनी सासूबाईंचीसुद्धा तारीफ केली. त्यासुद्धा छान शिघ्रकाव्य करतात असं सांगतिलं. या गप्पा मारता मरता पुढय़ातील पदार्थ कसे संपत गेले लक्षात आलं नाही. आता लंच डेट संपून दुपारच्या चहाची वेळसुद्धा झालेली होती. चहा घेता घेता आणि त्यांच्या कविता ऐकता ऐकता आमच्या गप्पा संपंल्या.

उकडीचे मोदक
साहित्य – 1 वाटी तांदळाची बारीक पिठी, 1 वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ, 1 चमचा वेलची पूड, चिमूटभर मीठ, 4 चमचे तूप, 1 चमचा तेल.
कृती – एक वाटी पाणी गरम करून चांगले उकळल्यावर त्यात चिमूटभर मीठ व एक चमचा तेल घालावे. त्यानंतर गॅस बंद करून एक वाटी तांदळाची पिठी घालावी व वाफ येऊ दयावी. दुसऱया भांडय़ात गुळाचा पाक करून त्यात ओलं खोबरं व वेलची पूड घालावी. थोडंस परतून गॅस बंद करावा. तांदळाची पिठी चांगली मळून त्याची हातावर छोटी लाटी घेऊन गोल पसरवावी. त्याला प्रथम बोटाने कळ्या पाडून मधे तयार खोबऱयाचे सारण भरावे. नंतर मोदक तयार करून वाफवून घ्यावा. साजूक तुपाबरोबर खायला द्यावा.

पुरणपोळी
साहित्य – 3 वाटय़ा हरभरा डाळ, 2 वाटय़ा गूळ, 1 वाटी साखर, अर्धा चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर,चवीनुसार मीठ, 1 वाटी कणीक, 1 वाटी मैदा, अर्धीवाटी साजूक तूप, 2 चमचे तेल. .
कृती – सर्वप्रथम एका भांडय़ात 4-5 वाटय़ा पाणी घालून हरभरा डाळ शिजवून घ्या. डाळ शिजत आल्यावर त्यात गूळ व साखर घालावा. गूळ आणि साखर मिसळल्यावर डाळ चांगली शिजली की ती गॅसवरून खाली उतरुन घ्या. नंतर पुरण्याच्या साच्यातून तिला बारीक करून घ्या. त्यात थोडे जायफळ पावडर व वेलची पूडसुद्धा घाला.
कणीक, मैदा, थोडं मीठ मिसळून 2 चमचे तेल मिसळून चांगले भिजवून मळून घ्यावे. त्यानंतर एका गोळ्याची पोळी लाटून त्यावर तयार केलेले पुरण पसरवा चारही बाजूंनी पोळी गुंडाळून बंद करा व थोडी लाटून घ्या. तव्यावर तुपाच्या साहाय्याने खरपूस भाजून साजूक तुपाबरोबर सर्व्ह करा.

जळगावी वांग्याचं भरीत
साहित्य – 2-3 भरीताची वांगी, पाव वाटी शेंगदाणे, 2 ंवाटय़ा कांद्याची पात चिरलेली, 1 लसूण, 10-12 हिरव्या मिरच्या, 2 चमचे भरडलेले धणे, अर्धी वाटी तेल, 1चमचा मोहरी, पाव चमचा हिंग.
कृती – वांग्यांना टोच मारून ती निखाऱयावर किंवा गॅसवर भाजून घ्यावीत. वरची साल काढूल बारीक चिरून घ्यावीत. मिरच्या, लसूण जाडसर वाटावं. तेल तापवून त्यात हिंगाची फोडणी करावी. त्यात मिरची-लसूण वाटण, धणे घालावे. त्यावर वांगी चांगली परतावी. नंतर मीठ, भाजलेले दाणे घालावे. सर्वात शेवटी कांद्याची पात घालून परतावं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या