आकाशातला रणगाडा ‘अपाचे’ हिंदुस्थानी हवाई दलात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शत्रूशी दोन हात करण्यासाठी हिंदुस्थानी जवानांच्या जिगरबाज हिमतीला तोड नाही. पण त्यासोबतच त्यांच्या दिमतीला आता अपाचे हेलिकॉप्टरही आले आहे. हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत शत्रूला थरकाप भरवणारी आठ ‘एएच-64ई’ अपाचे हेलिकॉप्टर्स मंगळवारी हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबानविरुद्ध वापरलेले हेच हेलिकॉप्टर आता हिंदुस्थानी जवानांचे शस्त्र बनले आहे. दरम्यान, अपाचेमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी व्यक्त केला.

पाण्याच्या फवाऱ्याने या थरारक हेलिकॉप्टर्सना सलामी देण्यात आली. त्यानंतर झालेल्या एका खास सोहळ्यात ही आठ हेलिकॉप्टर्स हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात देण्यात आली. ‘अटॅक हेलिकॉप्टर्स’ म्हणून ही हेलिकॉप्टर्स जगभर ओळखली जातात. हवाई दलाने बोइंग कंपनीशी अशा प्रकारच्या 22 हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी करार केला आहे. यामधील पहिली खेप हिंदुस्थानच्या स्वाधीन करण्यात आली. त्यामुळे हवाई दलाच्या ताफ्यात मिराज, सुखोई, तेजस, मिगसोबतच आता अपाचे हेलिकॉप्टर्सही आली आहेत.

युद्धात ठरणार ‘गेम चेंजर’

अपाचे हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या असंख्य खुबींमुळे युद्धात ते ‘गेम चेंजर’ ठरणार यात शंका नाही, असे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण हवामान कोणत्याही प्रकारचे असले तरी या हेलिकॉप्टरवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा नायनाट हे एकच लक्ष्य या हेलिकॉप्टरला माहीत आहे. शत्रूच्या किल्ल्याचाही भेद करण्याची ताकद आणि प्रचंड वेगात शत्रूच्या सीमेत घुसून पुन्हा त्याच वेगाने परत येण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे.

‘सुखोई’ची जागा घेणार

बोइंग एएच-64ई ही अपाचे हेलिकॉप्टर्स निव्वळ युद्धसमयी वापरण्याजोगीच असल्यामुळे ती हिंदुस्थानी लष्करात सामील करून घेण्यात आली आहेत. आपले लष्कर गेली बरीच वर्षे युद्धासाठी सुखोई एमआय-35 ही लढाऊ विमाने वापरत आहे. या विमानांची जागा आता अपाचे हेलिकॉप्टर्स घेणार आहेत.