
मधुकर ठाकूर । उरण
मागील पाच दिवसांपासून येथील एपीएम टर्मिनल ( मर्स्क ) कंपनीच्या ९९ कामगारांनी आपल्या कुटुंबियांसह सुरु केलेल्या उपोषण दरम्यान चार उपोषणकर्त्या कामगारांची ह्दयविकाराच्या तब्येत खालावल्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यातही पोलिसांच्या मध्यस्थीने चर्चेसाठी कमिटीची नावे पाठवल्यानंतरही एपीएमने दुर्लक्ष केल्याच्या विरोधात संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यां कामगारांनी जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. एपीएम व्यवस्थापनाच्या ताठर भुमिकेमुळे मात्र आंदोलक कामगार आणि कंपनीमधील संघर्ष आणखीनच टिपेला पोहोचला असून आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
येथील एपीएम टर्मिनल ( मर्स्क ) कंपनीच्या ९९ कामगारांनी सुरु केलेल्या आंदोलनाची पाचव्या दिवशीही दखल घेतलेली नाही. जिल्हाधिकारी, पोलिस आदींनी कंपनीच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही आंदोलक कामगारांशी चर्चा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली नसल्याचा आरोप सल्लागार ॲड.भार्गव पाटील.यांनी केला आहे. या पाच दिवसात एकूण चार कामगारांची तब्येत खालावलेली आहे. गुरुवारी (२२) भगवान म्हात्रे या उपोषणकर्त्यांला ह्दयविकाराचा झटकाही आला. शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी नंतर म्हात्रे यांना उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याची माहितीही भार्गव पाटील यांनी दिली. पोलिसांनी मध्यस्थी करीत एपीएम व्यवस्थापनाशी आंदोलनकर्त्याच्या वतीने चर्चा करण्यासाठी जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, शिवसेनेचे रायगड जिल्हा परीषद सदस्य विजय भोईर, काँग्रेसचे माजी रायगड जिल्हा परीषद सदस्य सदस्य वैजनाथ ठाकूर, अँड.भार्गव पाटील आणि कामगार प्रतिनिधी म्हणून कैलास पाटील, निशांत पाटील आणि हुतात्मा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष रजनीकांत पाटील आदींच्या नावांची यादी पाठविण्यात आली आहे.
मात्र त्यानंतरही कंपनीने चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिलाच नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यां कामगारांनी जाहीरपणे निषेध व्यक्त केल्याची माहितीही ॲड.भार्गव पाटील यांनी दिली.
दरम्यान, एपीएम व्यवस्थापनाशी आंंदोलनकर्त्याच्यावतीने चर्चा करण्यासाठी देण्यात आलेल्या नावांवर कंपनीने आक्षेप घेतला आहे. या आक्षेपार्ह नावे असलेल्या कमिटी बरोबर चर्चा करण्यास कंपनी व्यवस्थापन तयार नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. एपीएम व्यवस्थापनाच्या ताठर भुमिकेमुळे मात्र आंदोलक कामगार आणि कंपनीमधील संघर्ष आणखीनच वाढला असुन कामगारांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



























































