एपीएमसी मार्केट बुधवारपासून सुरू होणार; दररोज 400 गाड्या येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बंद करण्यात आलेले एपीएमसी मार्केट बुधवारपासून पुन्हा सुरू होत आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार भाजीपाला आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये दररोज 400 गाड्यांची आवक होणार आहे. प्रशासनाने पासेस दिलेल्या ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना फक्त मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार असून सोशल डिस्टन्सीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.

एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वच व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवण्याची मागणी एपीएमसी प्रशासनाला केली होती. त्यानुसार मार्केट लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर पुन्हा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केट सुरू करण्यासाठी अतिरिक्त पणन संचालक अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी कृती आराखडा तयार केला. त्यानुसार बुधवारपासून भाजीपाला आणि कांदा-बटाटा मार्केटमधील व्यवहार सुरू होत आहेत.

एकच गाडी माल मागवता येणार
भाजीपाला आणि कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांना दिवसाला फक्त एकच गाडी माल मागवता येणार आहे. रात्री बारापासून ते सकाळी आठपर्यंत येणाऱ्या गाड्यांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. भाजी मार्केटमध्ये दररोज फक्त 300 गाड्या येणार असून कांदा-बटाटा मार्केटमधील गाड्यांची संख्या फक्त 100 असणार आहे, असे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

कमी मालाची विक्री करता येणार नाही
भाजीपाला आणि कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून फक्त घाऊक मालाची विक्री करायची आहे. किरकोळ माल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे एपीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.