
>>राहुल गोखले
मानवाला पुन्हा चंद्रावर पाठविण्यासाठीच्या मोहिमांचे नियोजन अमेरिकेसह भारत व चीन हे देश करीत आहेत. अमेरिकेने ही मोहीम मार्च 2026 मध्ये करण्याचे निश्चित केले होते. तथापि ‘नासा’ संस्थेने तांत्रिक कारणांवरून ती मोहीम स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. तंत्रज्ञान अद्ययावत झालेले असून व गेल्या सहा दशकांचा अनुभव गाठीशी असूनही अशा तांत्रिक समस्या उद्भवतात तेव्हा पहिल्यावहिल्या यशस्वी समानव चांद्रमोहिमेचे महत्त्व अधोरेखित होते. याच मोहिमेच्या अंतरंगाचा सुधीर फाकटकर यांनी ‘अपोलो 11’ या पुस्तकात (प्रकाशक ः सकाळ प्रकाशन) सांगोपांग मागोवा घेतला आहे.
मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी लेखकाने त्या मोहिमेला लाभलेली दीर्घ पार्श्वभूमी कथन केली आहे. अंतराळात मानवच नव्हे तर यानदेखील पाठवायचे तर तसे उपकरण आवश्यक. अग्निबाणांचा विकास ही त्याची प्राथमिक पायरी. इसवी सन पूर्व 400 दरम्यान ग्रीक संस्कृतीत, त्यानंतर चिनी संस्कृतीत व सोळाव्या शतकात युरोपात अग्निबाणांच्या तंत्रज्ञानात कसा विकास होत गेला याचा आढावा लेखक घेतो. जर्मनीचे हर्मन ऑबर्थ, रशियाचे कॉन्स्टंटीन कॉन्स्टॅन्टिनोव्ह, यांच्या योगदानाचा उल्लेख लेखक करतो. आधुनिक अग्निबाणांचा शिल्पकार म्हणून गणल्या जाणाऱ्या रॉबर्ट गोडार्डने अग्निबाणाचे साधन वापरून मानव चंद्रावर जाऊ शकतो अशी मांडलेली कल्पना, त्याची अमेरिकेतील वृत्तपत्रांनी उडविलेली खिल्ली, रशियात सर्गेई कोरोलेव्ह यांनी केलेले संशोधन, दुसऱ्या महायुद्धाने अग्निबाणाच्या तंत्रज्ञान विकासाला दिलेली चालना, युद्धानंतर सुरू झालेले शीतयुद्ध, त्यातून अंतराळयुद्धाची पडलेली ठिणगी आणि रशिया-अमेरिका यांच्यातील अंतराळात पोहोचण्याची लागलेली चुरस हे वातावरण लेखकाने जिवंत केले आहे.
कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी रशियाने केलेली सिद्धता, त्यातील आर-7 प्रक्षेपणास्त्र वापरून आखलेल्या मोहिमेला आलेले अपयश, अमेरिकेची त्या मोहिमेवर असणारी हेरगिरीची नजर अशा तपशीलांमुळे पुस्तकाची खुमारी वाढली आहे. स्पुटनिक उपग्रह अवकाशात सोडून रशियाने त्या स्पर्धेत मारलेली बाजी, रशियन नेतृत्वाच्या वाढलेल्या अपेक्षा, समानव उपग्रह मोहिमेचा क्रुश्चेव्ह यांचा आग्रह, मानवाअगोदर श्वानांना अंतराळात सोडण्याचा केलेला प्रयोग, त्यात लायका श्वानाचा झालेला मृत्यू, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण स्पर्धेत मागे पड त असल्याची अमेरिकेत निर्माण झालेली भावना व त्यातून उत्पन्न झालेली अस्वस्थता या घडामोडींचे चित्रण लेखकाने रोचकपणे केले आहे. व्होस्टोक-1 मोहिमेत युरी गागारिनच्या रूपाने अंतराळात पहिल्या मानवस्पर्शाचे वर्णन लेखकाने केले आहे. 1963 मध्ये रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हला अंतराळात पाठवले व ती पहिली महिला अंतराळवीर ठरली. या सर्व घडामोडींचा वेध घेताना रशियाने मारलेली बाजी लेखक नमूद करतो.
‘चांद्रमोहिमेची तयारी’ हे पुस्तकातील सर्वात दीर्घ व खिळवून ठेवणारे प्रकरण. 1962 ते 1968 या दरम्यान रशिया व अमेरिकेत हे लक्ष्य ठेवून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा मागोवा लेखक त्यातून घेतो. त्यातून या दोन्ही देशांदरम्यान असणारी चुरस दृग्गोचर होते. या काळात झालेल्या अंतराळ मोहिमा, त्यादरम्यान झालेल्या काही दुर्घटना, अवकाशयानाची रचना करण्यापासून अंतराळवीराच्या पोशाखात झालेली सुधारणा, अमेरिकेत अपोलो-1 पासून सुरू झालेल्या मोहिमा, त्यात पृथ्वीभोवती भ्रमण करण्यापासून 1969 मध्ये अपोलो-11 मोहिमेत प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर नील आर्मस्ट्राँगने पाऊल ठेवणे इथपर्यंतच्या वेगवान घडामोडींचा भूराजकीय व तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून लेखक मागोवा घेतो. जूल्स व्हर्नने एकोणिसाव्या शतकात लिहिलेली ‘फ्रॉम दि अर्थ टू मून’ ही काल्पनिका प्रत्यक्षात आली असे लेखक नमूद करतो.
अंतराळ मोहिमांचे वर्णन करतानाच आनुषंगिक संशोधनाचा लाभ पुढे क्रीडा क्षेत्रापासून घरोघरी धूळ गोळा करण्यासाठीच्या यंत्रांच्या विकासासाठी कसा झाला याकडे लेखक लक्ष वेधतो. अपोलो 11 मोहिमेविषयी अनेक प्रवाद होते व आहेत. हवा नसताना चंद्राच्या पृष्ठभागावर अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकताना कसा दिसतो, अंतराळवीरांच्या बुटांचे ठसे कसे उमटले किंवा दोन अंतराळवीरांच्या सावल्या वेगवेगळ्या दिशांना कशा दिसतात आदी शंकांचे लेखकाने केलेले निरसन हे पुस्तकाचे वैशिष्टय़. प्रस्तुत पुस्तक मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडविते. मधुमिता शिंदे यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक. आकृत्या व रेखाचित्रे मजकुरास पूरक.
अपोलो 11
n लेखक ः सुधीर फाकटकर
n प्रकाशक ः सकाळ प्रकाशन, पुणे
n पृष्ठे ः 207, n मूल्य ः रु. 290/-
























































