
अॅपल आपल्या वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहे. अॅपल उत्पादनांच्या किंमती जास्त असल्या तरी अनेकजण अॅपलची उत्पादन घेण्यासाठी प्राधान्य देतात. अॅपलच्या उत्पादनांना सॅमसंग आणि एमआयची उत्पादनांनी सध्या चांगलेच आव्हान दिले आहे. त्यामुळे अॅपलच्या उत्पादनांची वार्षिक विक्री कमी झाली आहे. त्याचा परिणाम कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्या वेतनावरही झाला आहे. टिम कुक यांचे वार्षिक वेतनात 2019 मध्ये कपात करून ते 116 लाख डॉलर ( सुमारे 83 कोटी रुपये) करण्यात आले आहे. टिम कुक यांचे 2018 मध्ये वार्षिक वेतन 157 लाख डॉलर म्हणजे (सुमारे 112 कोटी रुपये) होते. अमेरिकेतील बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंजला याबाबत अॅपलने माहिती दिली आहे.
टिम कुक यांच्या वेतनात मोठी कपात झाली आहे. त्यांचा प्रोत्साहन भत्ताही कमी करण्यात आला आहे. कंपनीनेच याबाबतची माहिती दिली आहे. 2018 मध्ये त्यांना 120 लाख डॉलर एवढा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला होता. तर 2019 मध्ये 77 लाख डॉलरचा भत्ता त्यांना देण्यात आला आहे. कंपनीने 2018 मध्ये ठरवलेल्या उद्दीष्टांपेक्षा उत्पादनांची जास्त विक्री झाली होती. मात्र, 2019 मध्ये ठरवलेल्या उद्दीष्ट्यांपेक्षा उत्पादनांची 28 टक्के कमी विक्री झाली आहे.
टिम कुक यांचे मूळ वेतन 30 लाख डॉलर आहे. याशिवाय त्यांना कंपनीकडून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. कंपनीने सुरक्षा आणि इतर कामे चांगली व्हावी यासाठी कुक यांना खाजगी विमानही दिले आहे. वेतनाशिवाय कुक यांच्याकडे कंपनीचे प्रमुख म्हणून 11.30 कोटी डॉलरचे अॅपलचे शेअरही आहेत.
अॅपल फोनसोबतच नवनवीन उत्पादने आणण्यावरही भर देत आहे. नुकतीच कंपनीने प्लस टीव्ही ही सेवाही सुरू केली आहे. मात्र, या वर्षात उत्पादनांची विक्री कमी झाल्याने कुक यांच्या वेतनातही कपात करण्यात आली आहे.


























































