
>> स्पायडरमॅन
ब्लूमबर्गचा रिपोर्ट खरा ठरल्यास पृथ्वीच्या कक्षेत देशोदेशीच्या इतर उपग्रहांच्या जोडीलाच ऍपल कंपनीचा स्वतःचा उपग्रहदेखील लवकरच प्रस्थापित झालेला बघायला मिळेल. उपग्रह निर्मितीच्या क्षेत्रातील तज्ञांच्या अंदाजानुसार जवळपास डझनभर कर्मचाऱयांची एक गुप्त टीम उपग्रह तंत्रज्ञानावर काम करत आहे. ही टीम पुढील पाच वर्षांत ऍपल कंपनीच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. अर्थात ऍपलचा उपग्रह पुढील पाच वर्षांत तयार झालेला दिसू शकतो. तज्ञांच्या अंदाजानुसार या उपग्रहनिर्मितीच्या टीममध्ये एरोस्पेस, उपग्रह आणि अँटेना डिझाईन उद्योगांमधून आलेले हुशार लोक कार्यरत करण्यात आले आहेत. या उपग्रहनिर्मितीमागे ऍपलचा नक्की उद्देश तरी काय आहे? पारंपरिक वायरलेस नेटवर्क आणि सेल टॉवरशिवाय आयफोन, आयपॅड आणि मॅकसारख्या डिव्हाइसवर थेट बीम इंटरनेट सेवा देण्याची कल्पना या निर्मितीमागे आहे. आहे ना भारी कल्पना? कंपनीने मांडलेल्या सिद्धांतानुसार सध्या कागदावर तरी कंपनीला इंटरनेट सेवा प्रदात्यांना बायपास करणे आणि आपल्या ऍपलच्या डिव्हाइसेससाठी स्वतःच इंटरनेटची सेवा पुरविणे शक्यतेत उतरू शकते. अहवालानुसार स्वतः टीम कुक या प्रयत्नांच्या मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ ऍपलसाठी हा प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वाचा असल्याचेच स्पष्ट होते. अर्थात ही काम करणारी टीम आणि ऍपलसाठीदेखील हा नवा प्रयोग असल्याने तो मध्येच अर्धवटदेखील सोडला जाण्याची खूप शक्यता असल्याचे काही तज्ञांचे मत आहे. जरी हा निर्मिती प्रकल्प यशस्वी झाला तरी पुढे भविष्यात या उपग्रहाचे इतर काय उपयोग असतील याबद्दल काहीच स्पष्टता समोर आलेली नाही. सध्या गुगलकडे स्वतःचे उपग्रह आणि त्या उपग्रहाला पूरक असे रिसिव्हर्स आहेत. ऍपल जर या निर्मितीप्रक्रियेत यशस्वी झाले तर ते नक्कीच गुगलच्या एक पाऊल पुढे असणार आहेत. कारण जर ऍपलच्या या उपग्रहाची कल्पना यशस्वी ठरली तर मोबाईलधारकांना सध्याच्या कोणत्याच इंटरनेट सेवादात्यावरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

























































