
ऍपल कंपनी हिंदुस्थानात दोन आयफोनचे कारखाने उभारणार आहे. या दोन कारखान्यांतून जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळू शकतो, अशी माहिती हिंदुस्थानचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी दिली आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि हुवर इन्स्टिटय़ूशनचे फेलो हेरोल्ड डब्ल्यू. मॅकग्रा यांच्यासोबत फायरसाइड चॅट कार्यक्रमात ते बोलत होते. हे दोन कारखाने बंगळुरू आणि चेन्नईजवळ उभारले जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
हिंदुस्थानात आयफोन असेंब्लीची व्याप्ती वाढवली जाणार आहे. त्यासाठी ऍपलने हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. उत्पादनासाठी मोठय़ा संख्येने चीनवर अवलंबून असणाऱया ऍपल कंपनीलाही उत्पादन साखळीत विविधता आणायची आहे. त्यामुळे हिंदुस्थानात नवीन कारखाने उभारणे गरजेचे आहे. हे ऍपल आणि हिंदुस्थान या दोघांसाठी फायदेशीर ठरू शकतील. हिंदुस्थानातील फोन उत्पादनातील व्हॅल्यू वाढत आहे. सुरुवातीच्या काळात ते एक किंवा दोन अंकी होते, परंतु आता यामध्ये वाढ झाली आहे.

























































