
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 120 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला उद्या, गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार होती. मात्र तांत्रिक कारण पुढे करत म्हाडाने ही ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा झाली असून त्यांना आणखी काही काळ वेटिंग करावे लागणार आहे.
सोडतीत दोन वेळा समावेश करूनही विक्री न झालेल्या घरांची ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. या योजनेत कांदिवली, चारकोप, अॅण्टॉप हिल, पवई, मानखुर्द, मालवणी, घाटकोपर, कन्नमवार नगर, भायखळा, लोअर परळ, ताडदेव, शीव, अंधेरी येथील घरांचा समावेश आहे. अगदी 31 लाखांपासून ते 8 कोटी रुपयांपर्यंतची घरे यात आहेत. या घरांची सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध होईल, असे नमूद करण्यात आले होते. पंरतु तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात व माहिती पुस्तिका ही गुरुवारी उपलब्ध होणार नाही, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली. जाहिरात व माहिती पुस्तिका संकेतस्थळावर कधी उपलब्ध होईल याबाबत म्हाडाच्या संकेतस्थळाद्वारे कळविण्यात येणार आहे.




























































