पाकिस्तानचे कौतुक, शाहबाज शरीफ यांना खास विनंती… ज्योती मल्होत्राने तिच्या डायरीत काय काय लिहिले?

हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​एनआयए आणि आयबीच्या ताब्यात आहे. तिच्याकडून एक डायरी सापडली आहे. डायरीमध्ये पाकिस्तान भेटीचा उल्लेख आहे. ज्योतीने पाकिस्तान सरकारला मंदिरांचे संरक्षण करण्याची विनंती केली आहे. 1947 मध्ये विभक्त झालेल्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याबद्दल डायरीत उल्लेख केला आहे. हरियाणाच्या 33 वर्षीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत.

एनआयए आणि आयबीच्या ताब्यात असलेल्या ज्योतीकडून आता एक डायरी जप्त करण्यात आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळताना दिसते. या डायरीत एकूण 10 ते 11 पाने आहेत. त्यापैकी आठ पाने प्रवासवर्णनावर आधारीत आहेत. याच डायरीतील तीन पाने विशेषतः तिच्या पाकिस्तान प्रवासाच्या घटनांवर आहेत. या डायरीमध्ये तिने हिंदीमधून लिखाण केलेले आहे. यात पाकिस्तानात घालवलेला वेळ आणि तिथल्या लोकांशी संबंधित आठवणींचा उल्लेख आहे.

ज्योतीने तिच्या डायरीत पाकिस्तान भेटीचा उल्लेख केला आहे आणि लिहिले आहे की, पाकिस्तानचा 10 दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर, आज मी माझ्या मायदेशी हिंदुस्थानात परतत आहे. सीमांमधील अंतर किती काळ राहील हे मला माहित नाही, पण मी प्रार्थना करते की, हृदयातील तक्रारी दूर व्हाव्यात. आपण सर्व एकाच मातीपासून बनलेले आहोत, एकाच भूमीचे लोक आहोत. डायरीमध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये मिळालेल्या स्वागताचे आणि आदरातिथ्याचे मनापासून कौतुक केले आहे. त्यांनी असेही लिहिले आहे की तिथल्या लोकांनी ज्या उबदारपणाने त्यांचे स्वागत केले तो त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.

ज्योतीने तिच्या डायरीत पाकिस्तान सरकारकडून आलेल्या एका खास विनंतीचाही उल्लेख केला आहे. तिने लिहिले आहे की, पाकिस्तान सरकारने तेथील मंदिरांचे संरक्षण करावे आणि 1947 मध्ये विभक्त झालेल्या कुटुंबांना भेटण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यावरून असे दिसून येते की ज्योती केवळ पर्यटक म्हणून नाही तर भावनिक मोहिमेवरही पाकिस्तानला गेली होती. तिने यात असे म्हटले आहे की, तिचा हा अनुभव शब्दांच्या पलीकडला होता.

ज्योती मल्होत्रा ​​सोशल मीडियावर एक लोकप्रिय चेहरा होती. तिचे इंस्टाग्रामवर 1.33 लाख फॉलोअर्स होते, जिथे तिने प्रवास, संस्कृती आणि इतिहासाशी संबंधित कंटेंट शेअर केला. पण अटक झाल्यानंतर तिचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की, ती एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्स वापरून पाकिस्तानच्या संपर्कात होती आणि गुप्त माहिती शेअर करत होती.