
कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजुरीचा मार्ग सुकर झाला आहे. नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय सचिवांच्या बैठकीत कळंब येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या दोन्ही न्यायालयास आवश्यक असणार्या पदनिर्मितीस उच्चस्तरीय सचीव समितीने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
कळंब येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची उभारणी करावी, अशी गेल्या अडीच दशकांपासून मागणी होत होती. याबाबत आमदार पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून येत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या ठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, या ठिकाणी अतिरिक सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजुरी मिळावी आणि न्याय विभागाकडून गरजेच्या असलेल्या मनुष्य बळासाठी पदनिर्मिती व्हावी, यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते.
7 जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर ) कळंब या ठिकाणच्या पदनिर्मितीच्या अनुषंगाने उपसमितीची बैठक झाली होती. यानंतर एप्रिलअखेर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचीव समितीच्या बैठकीत अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयाच्या एकूण 33 पदनिर्मितीस अनुमती प्राप्त झाल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री प्रा. तानाजीराव सावंत, पालकमंत्री गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, यांचे आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.
सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यासाठी आवश्यक असलेल्या पदनिर्मितीस अनुमती दिल्यानंतर अहवाल 23 मे रोजी विधी व न्याय विभागास प्राप्त झाला आहे. संबंधित विभाग हा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीस लवकरच सादर करणार असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
इमारतीच्या फर्निचरसाठी निधी
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी गरजेच्या पायाभूत सुविधा जवळपास पूर्णत्वास आलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी इमारत बांधकाम पूर्ण झाले असताना फर्निचर व तत्सम कामासाठी निधीची वानवा होत होती. त्यासाठी 2021 च्या अर्थसंकल्पामध्ये 1 कोटी 37 लाखांची तरतूद केलेली होती, त्यामुळे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे लवकरच कळंब येथील अतिरिक्त न्यायलयास हिरवा कंदील मिळेल, असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.


























































