
>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ
सध्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी जीवनसत्त्व ‘सी’चे किती महत्त्व आहे हे सतत सगळीकडे विशेषतः सोशल मीडियावर सांगितलं जाते. जीवनसत्त्व ‘सी’ हे पाण्यात सहज विरघळणारे असे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे भाज्या व फळे चिरून धुतल्यास किंवा जास्त वेळ त्यांना शिजवल्यास ते नष्ट होतं. तसेच खूप वेळ पदार्थ हवेत उघडे ठेवून ऑक्सिडेशन ही क्रिया झाल्यास तसेच लोह किंवा तांब्याच्या संपर्कात आल्यास ते नष्ट होऊ शकते.
जीवनसत्त्व सी आपल्याला लिंबू आणि लिंबू वर्गातील फळे आणि पालेभाज्या यातून मिळतं. थोडक्यात जीवनसत्त्व सी आपल्याला ताज्या फळातून आणि भाज्यातून मिळत असते.
कशासाठी आवश्यक
1. आपल्या शरीरात जे कोलेजन नावाचे प्रथिन आढळते ते आपल्याला हाडे, दात आणि त्वचा यासाठी आवश्यक असते. जर जीवनसत्त्व सी आपल्या शरीरात कमी पडले तर कोलेजनची निर्मिती नीट न झाल्याने जखम नीट भरून न येणे आणि हाडे आणि दात यांचे आरोग्य बिघडू शकते.
2. जीवनसत्त्व ‘सी’मुळे अँटिबॉडीज आणि माक्रोफेजेस यांची कार्यक्षमता वाढीस लागते आणि अशा पद्धतीने ते अँटी व्हायरल, अँटी बेक्टेरियल असे काम करतात. इतकेच नाही तर बेक्टेरियल
टॉक्सिन जे बाहेर पडतात त्यांचा विनाश करण्याचं काम यामुळे होते.
3. जीवनसत्त्व सी आणि इन्फेमेशन यांचा जवळचा संबंध आहे. Inflammation कमी करण्यासाठी जीवनसत्त्व ‘सी’चा उपयोग होतो.
जीवनसत्त्व सी interferon (व्हायरसच्या संसर्गात पेशींनी बनविलेले प्रथिन) तयार करतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
4. ताणतणाव सध्या खूपच वाढलाय. अनेक लहानमोठय़ा गोष्टींचा ताण येतो. ताणतणावामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि ही वाढलेली पातळी रोगप्रतिकारक शक्ती कमी करते. कॉर्टिसोल कमी करण्यासाठी जीवनसत्त्व ‘सी’चा उपयोग होतो.
5. शरीरात होणारे चयापचय आणि प्रदूषण, व्यायाम यामुळे जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होत असतो. त्यालादेखील अँटीऑक्सिडंट्स म्हणून जीवनसत्त्व सीचा उपयोग होतो.
सध्याच्या काळात जीवनसत्त्व ‘सी’ची कमतरता किंवा त्याची लक्षणे कोणाला आहे असे सहसा दिसून येत नाही. जे खूपच आजारी आहेत, ज्यांना अजिबात जेवण जात नाही त्यांना जीवनसत्त्व ‘सी’ची कमतरता होऊ शकते. जीवनसत्त्व सी गोळय़ाचे दुष्परिणाम नाहीत. ज्यांचे हिमोग्लोबीन कमी असेल त्यांना अतिरिक्त जीवनसत्त्व सी गोळी घेतल्यास हिमोग्लोबिन वाढायला मदत होते.
आपल्याला दिवसाला 40mg
इतके जीवनसत्त्वे लागते.
कशात किती जीवनसत्त्व
आवळा – 600 mg/100gms
शेवग्याच्या शेंगा – 220 mg /100 gms
पेरू – 212 mg /100 gms
लिंबू – 53 mg/100 gms
संत्रे – 48 mg/100 gms
ढोबळी मिरची – 137 mg/100 gms
यावरून आपल्याला सहज कळते की, जीवनसत्त्व सी मिळवणे हे खूप सोपे आहे.
आहारातील जीवनसत्त्व कसे वाढवावे?
भाजी जमेल तशी कच्ची वा कमीत कमी शिजवून आणि ताजी खावी. परत परत गरम करू नये.
मोड धान्य खावीत. मोड आणले की जीवनसत्त्व सी 4 ते 30 पट वाढू शकते.
लिंबू साले, संत्री साले यांची चटणी खावी.
आवळा नसेल तर आवळा पावडर खावी.
शेवगा शेंगा किंवा त्याची पावडर मिळते ती खावी.
कोशिंबीर आणि इतर पदार्थ जसे की वरण भात, पोहे यावर लिंबू पिळायची सवय ठेवावी.
दिवसाला 1 ते 2 फळे खावीत.
आठवडय़ात 2 वेळ पालेभाजी असावी.



























































