एकच लक्ष्य- ऑलिम्पिकमध्ये पदक! मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधवचे ध्येय

328

हिंदुस्थानच्या तिरंदाजांनी आशियाई कप, आशियाई चॅम्पियनशिप, आशियाई गेम्स, वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली. फक्त ऑलिम्पिकच्या इतिहासात हिंदुस्थानला एकही पदक जिंकता आलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगलेय. प्रतिष्ठsच्या स्पर्धेत पदक जिंकण्यासाठीच सर्वस्व पणाला लावणार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचा मराठमोळा तिरंदाजपटू प्रवीण जाधव याने. दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना या 24 वर्षीय पठ्ठय़ाने तिरंदाजी, लॉकडाऊन, वडिलांची मेहनत आदी बाबींवर दृष्टीक्षेप टाकला.

पाऊस पडला तरीही सराव कायम
ऑलिम्पिक टेस्ट इव्हेण्टसाठी टोकियोमध्ये गेलो होतो. त्यावेळी एक बाब प्रकर्षाने दिसून आली, ती म्हणजे तिथे दिवसभर पाऊस असायचा. त्यामुळे टार्गेट अंधुक दिसायचे. हवा पण बऱयापैकी होती. ती स्पर्धा आटपून हिंदुस्थानात आल्यानंतर आर्मीला खेळाडूकडून याबाबत ‘फिडबॅक’ द्यावे लागले. स्पर्धा दरम्यान आलेल्या अनुभवाची माहिती आर्मीला प्रत्येक वेळी द्यावीच लागले. तिथपासून पाऊस आल्यानंतरही आम्ही हिंदुस्थानातही सराव करू लागलो. याचा फायदा आम्हाला पुढल्या वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो, असा विश्वास प्रवीण जाधव याने यावेळी व्यक्त केला.

आमच्या खेळात रँकिंग महत्त्वाची
मी आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. यामध्ये आशिया कपमध्ये कांस्य तर जागतिक स्पर्धेत रौप्य पदकाचा समावेश आहे. तिरंदाजी या खेळामध्ये रँकिंग महत्त्वाची असते. प्रत्येक स्पर्धेत पदक मिळाले नाही तरी चालेल, पण चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे असते. कारण रँकिंग चांगले असल्यास पुढल्या स्पर्धेत त्याचा फायदा होतो, असे प्रवीण जाधवने पुढे स्पष्ट केले.

लॉकडाऊनमध्येही सराव
मी आर्मीमध्ये नोकरीला असल्यामुळे लॉकडाऊनमध्येही कसून सराव केला. आर्मी इन्स्टिटय़ूटमध्ये पहाटे रनिंगचा व्यायाम केल्यानंतर नऊ ते अकरा यावेळेत तिरंदाजीचा सराव करीत होतो. त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा यावेळेत पुन्हा तिरंदाजीचा सराव करायचो. तसेच त्यानंतर एक तास पुशअप्ससह आदी व्यायाम करायचो, असे प्रवीण जाधव सांगतो.

ऍथलेटीक्स ते तिरंदाजी
2010-11 सालापासून माझी पावले खेळांकडे वळली. सुरुवातीला ऍथलेटीक्समध्ये नशीब आजमावले. पण माझी शारीरिक रचना, उंची ही ऍथलेटीक्ससाठी पूरक नव्हती. त्यामुळे ऍथलेटीक्सपासून दूर राहा असा सल्ला काहींनी दिला. अमरावतीमधील क्रीडा प्रबोधिनीमध्ये तिरंदाजी या खेळाच्या सरावाला सुरुवात केली. सुनील ठाकरे या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचे कसब आत्मसात केले. 2013-14 सालामध्ये शालेय राष्ट्रीय स्पर्धेत दोन पदके पटकाविली. त्यानंतर माग वळून बघितले नाही, असे प्रवीण जाधव यावेळी आवर्जून म्हणाला.

वडीलांनी केली प्रचंड मेहनत
माझे कुटुंब साताऱयातील फलटण तालुक्यात वास्तव्य करते. आई गृहिणी आहे. वडिलांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत केलीय. रानामध्ये काम करणे, बिल्डिंगमध्ये मजुराचे काम करणे, गवंडीचे काम करणे आदी काम करीत त्यांनी आम्हाला सांभाळले. मी आर्मीमध्ये नोकरीला लागल्यानंतर त्यांना अशाप्रकारची कामे करू नका असे सांगितले. आता गाई, शेळ्या विकत घेतल्या असून त्याद्वारे दूध विकून, शेणखत विकून उत्पन्न कमवता येत आहे, असे प्रवीण जाधव पुढे नमूद करतो.

आपली प्रतिक्रिया द्या