… असेही ‘ऑस्कर!’

>> दिलीप जोशी 

हॉलीवूडच्या प्रभावी चित्रपटांसाठी दिले जाणारे ‘ऑस्कर’ पारितोषिक जगप्रसिद्ध आहे. जीवनाच्या विविध अनुभूतींचे प्रत्ययकारी चित्रण करून त्याची मनाचा ठाव घेणारी कथा पडद्यावर रंगवायची हे तसे कठीण काम. कधी सत्यकथा तर कधी कल्पित कहाणीचा विस्मयकारी आविष्कार पडद्यावर साकार करून ‘ऑस्कर’ हे चित्रजगतातलं मानचिन्ह प्राप्त केलं जातं. त्याचं महत्त्व आता इतकं आहे की, ‘नोबेल’सारखंच ‘ऑस्कर’सुद्धा एक विशेषण झालंय.

कोणत्याही क्षेत्रातल्या देदीप्यमान यशासाठी दिल्या जाणार्‍या पुरस्काराला त्या क्षेत्रातलं नोबेल किंवा ऑस्कर म्हणण्याची पद्धत रूढ झाली ती त्या गोष्टीचं अद्वितीय स्वरूप अधोरेखित करण्यासाठी. असंच एक ‘ऑस्कर’ आपल्या देशातील सिक्कीम या सुमारे 7 हजार चौ.मि. क्षेत्रफळाच्या हिमालयातील छोट्याशा राज्याला नुकतंच मिळावं. 1975 मध्ये इंदिरा गांधींच्या कुशल राजकारणामुळे सिक्कीम हे छोट्या राजाचं संस्थान हिंदुस्थानचं त्यावेळचं तेविसावं राज्य बनलं. या हिमालयात डिप्लोमसीने चीनचा जळफळाट झालाच, पण इंदिराजींनी त्याची तमा बाळगली नाही.

हिंदुस्थानचा अविभाज्य भाग झालेल्या सिक्कीमला 1994 पासून सलगपणे खंबीर नेतृत्व लाभलं ते पवनकुमार चामलिंग यांचं. सातत्याने पाच वेळा मुख्यमंत्री होणारे पवनकुमार आधुनिक सिक्कीमचे शिल्पकार आहेत. उत्तर-पूर्व किंवा ईशान्येकडील राज्यं अथवा सिक्कीमसारख्या हिमालयाच्या कुशीतला राज्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. जिथले नेते देशपातळीवरच्या राजकारणात चमकताना फारसे दिसत नाहीत. एखादे संगमा सोडले तर बाकीच्यांची चर्चा आपल्याकडे होत नाही. त्यातही सातत्याने विधायक कार्यात स्वतःला गुंतवून घेऊन आपण बरं आणि आपलं राज्य बरं असं मानून खर्‍या अर्थाने बरं आणि बरंच असं दोन्ही प्रकारचं काम करणारं नेतृत्व छोट्या राज्याच्या परिघाबाहेर ठाऊक नसतं. पवनकुमार चामलिंग त्यापैकीच एक.

गेल्या महिन्यात मात्र ते अचानक चर्चेत आले. साधारणपणे राजकारण्यांची चर्चा त्यांच्या राजकीय यशापयशाशी निगडित असते. पवनकुमार यांच्या नावाचा जगभर डंका वाजला तो वेगळ्याच कारणासाठी. संयुक्त राष्ट्रांच्या, अन्न आणि शेती संघटनेने सिक्कीम राज्याची, जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय (ऑरगॅनिक) शेती करणारं राज्य म्हणून मान्यता दिली आणि या यशस्वीतेचे प्रणेते पवनकुमार चामलिंग यांना रोम येथे हरित क्षेत्रातलं ‘ऑस्कर’ मानलेलं ‘फ्युचर पॉलिसी गोल्ड ऍवॉर्ड’ प्रदान करण्यात आलं. तब्बल एक्कावन्न देशांच्या सेंद्रिय शेतीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून पवनकुमार यांनी देशाला गौरव प्राप्त करून दिला.

कोणतीही रासायनिक खतं न वापरता किफायतशीर शेती करण्यासाठी राज्यभरातल्या पासष्ट हजारांहून अधिक शेतकर्‍यांना प्रवृत्त करणं, त्यांना त्याबाबतचं मार्गदर्शन करणं, त्यांना त्याबाबतचं मार्गदर्शन करणं यासाठी अथक प्रयत्नांची गरज होती. 2003 पासूनच पवनकुमार यांनी हा ध्यास घेतला आणि टप्प्याटप्प्याने रासायनिक खतांचं आपल्या राज्यातून ‘मूळ’ उच्चाटन केलं. त्याशिवाय  संपूर्ण प्लॅस्टिकबंदीचा प्रयोगही त्यांनी सिक्कीममध्ये यशस्वी करून दाखवला. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय पारदर्शकता खर्‍या अर्थाने असेल तर एखादा मुख्यमंत्री काय कार्य करू शकतो ते पवनकुमार यांनी सिक्कीममध्ये सिद्ध केलं आहे.

छोट्या गावाचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणारे पवनकुमार हाडाचे शेतकरी. 1994 मध्ये अवघ्या ३४ व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले ते आजतागायत त्याच पदावर आहेत. 2002 मध्ये त्यांच्या सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रन्टने तिथल्या विधानसभेच्या सर्व जागा जिंकल्या. 1994 पासून केंद्रात अनेकदा सत्ताबदल झाले. विंविध पक्षांची सरकारं आली. मात्र आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी त्या सर्वांशी जुळवून घेत. पवनकुमार सिक्कीम सांभाळत राहीले. सेंद्रिय शेतीच्या त्यांच्या स्वप्नाची 2016 मध्ये शंभर टक्के पूर्तता झाली. 2003 पासून रासायनिक खतं आणि कीटकनाशकंही हळूहळू कमी करत आता सिक्कीमने संपूर्ण सेंद्रिय शेतीचं उद्दिष्ट गाठलं.

त्यात अडचणी आल्याच असतील. काही ठिकाणी विरोधही झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एक प्रकारे हे म्हटलं तर प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखंच होतं. मात्र शे-दोनशे वर्षांपूर्वी केवळ सेंद्रिय शेतीच होत होती आणि चार-पाच हजार वर्षांच्या आपल्या शेतीच्या इतिहासातला मोठा काळ नैसर्गिक संतुलन सांभाळूनच शेती करण्याचा आहे हे लक्षात घेतलं तर ‘जुन्यातलं’ सोनं ‘टिकवण्याचा हा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. 2010 आणि 16 मधल्या सिक्कीममधल्या पीक उत्पादनाचा विचार केला तर तिथे मुख्यत्वे विकणारं आलं, जिरं किंवा फळं यांच्या शेतीतील उत्पादनात वाढच झाली आहे. मॅन्डेरिनचं प्रमाणही साधारण पूर्वीसारखंच आहे. नवा प्रयोग करताना काही त्रुटी आल्या तर त्यावर मात करून पुढे जाण्याचे मार्गही सापडतील.

पवनकुमार यांच्या प्रयत्नातून सिक्कीममध्ये सेंद्रिय शेतीचे ‘वारे’ वाहू लागले आणि ‘हरित-ऑस्कर घेऊन आले तसं देशात इतरत्रही होऊ शकतं. लडाखचे शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे सोनम वॉगचुक काय किंवा सिक्कीमचे पवनकुमार काय हे हिमालयातले हिरे आहेत. आता सिक्कीमला गेलात तर तो प्रदेश नव्या नजरेने पाहा. ‘किरण’ नावाने नेपाळी भाषेत लेखन करणारा एक साहित्यिक सिक्कीमच्या आशेचा ‘किरण’ ठरलेला मुख्यमंत्री तेथे आहे याचं नक्कीच कौतुक वाटेल.

khagoldilip@gmail.com