
आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी गुरुवारी (दि. 18) क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी 20 लाख रुपये बेस प्राईज ठेवण्यात आली. लिलावाच्या तीन दिवस आधीच अर्जुन तेंडुलकरने अष्टपैलू कामगिरी करून मास्टर ब्लास्टर धमाका केला. पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 31 चेंडूंत 77 धावांची वादळी खेळी केली. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने आपल्या खेळीत पाच चौकार आणि आठ षटकारांचा घणाघात केला. याचबरोबर अर्जुनने तीन बळीही टिपत सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. अर्जुन तेंडुलकरच्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने पोलीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत इस्लाम जिमखान्याचा 194 धावांनी पराभव केला.
























































