जय शहांनी श्रीलंकन क्रिकेटची वाट लावली, अर्जुना रणतुंगा यांचे गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयचे सचिव जय शहा हे श्रीलंकेचे क्रिकेट चालवत आहेत. त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाची वाट लागली आहे, असा खळबळजनक आरोप श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर केला आहे.

हिंदुस्थानात सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतील नऊपैकी सात सामने गमावून श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. शिवाय, 2025मध्ये होणाऱया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीटही श्रीलंकन संघाला बुक करता आले नाही. त्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (एसएलसी) निलंबित केले. बोर्डातील सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने त्यांचे सदस्यत्व तडकाफडकी काढून घेतले. त्यामुळे 1996 मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार अर्जुना रणतुंगा कमालीचे संतापले. ते म्हणाले, श्रीलंकेचे क्रिकेट जय शहा चालवतात. त्यांच्या दबावामुळे आमचे क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त होत आहे. जय शहा यांचे वडील हिंदुस्थानातील एक शक्तिशाली नेते आहेत. वडिलांच्या ताकदीच्या जोरावर जय शहा यांनी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची घडी विस्कटवली, असा आरोपही त्यांनी केला.